देशात एकीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 6 हजार 809 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे. त्याआधी शुक्रवारी दिवसभरात 7 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेत 410 रुग्णांची घट झाली आहे. दोन वर्षांनंतर कोरोनाचा विळखा कमी झाल्यानं देशात यंदा गणेशोत्सव धूम धडाक्यात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाल्याची बाब दिलासादायक आहे. देशात गेल्या 24 तासांत सक्रिय कोरोना रुग्णांमध्येही मोठी घट झाली आहे. सध्या देशात 55 हजार 114 कोरोनाबाधित उपचाराधीन आहेत. शनिवारी दिवसभरात 8 हजार 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.12 टक्के इतकं घसरलं आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 98.69 टक्के झालं आहे.