शिल्पा शेट्टी आणि हॉलिवूड स्टार रिचर्ड गिअर यांच्या गाजलेल्या 'त्या' चुंबन प्रकरणातून अखेर चौदा वर्षांनंतर शिल्पा शेट्टीला दिलासा मिळाला आहे.
याप्रकरणातून शिल्पा शेट्टीला दोषमुक्त करत असल्याचं मुंबईतील दंडाधिकारी कोर्टानं जाहीर केलं आहे.
रिचर्ड गिअरनं अचानकपणे जबरदस्तीनं घेतलेल्या त्या चुंबनाच्यावेळी शिल्पा हतबल झाली होती.
त्यामुळे यात तिचा काहीच दोष नाही, तेव्हा तिच्याविरोधातील तक्रारीत काहीही तथ्य दिसत नाही असं दंडाधिकारी केतकी चव्हाण यांनी आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे.
साल 2007 मध्ये राजस्थानमध्ये एड्स जनजागृतीच्या एका जाहीर कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गिअरनं घेतलेल्या चुंबन प्रकरणामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये मिळून तीन गुन्हे दाखल झाले होते.
त्यापैकी दाखल झालेला अश्लीलतेचा हा गुन्हा रद्दबातल करण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयानं सोमवारी दिले आहेत.