ब्रिटनचा नवा राजा तिसरा किंग चार्ल्स याचा 6 मे रोजी राज्याभिषेक होणार आहे. त्याचवेळी किंग चार्ल्सची पत्नी कॅमिला हिला ब्रिटनची राणी म्हणून घोषित केले जाईल. मात्र यावर्षी ब्रिटनच्या राजघराण्याने एक निर्णय घेतला आहे. या राज्याभिषेकावेळी ब्रिटनची नवी राणी कोहिनूरचा मुकुट घालणार नाही. राज्याभिषेकावेळी ब्रिटनची नवी राणी कॅमिला ही कोहिनूरचा मुकुट नाही तर राणी मेरीचा मुकुट घालणार आहे. ब्रिटनच्या राजघराण्याकडून असं सांगण्यात येत आहे की, हा मुकुट पर्यावरणाला अनुकुल आहे. आपल्या राज्याभिषेकावेळी किंग चार्ल्स एक विशेष असा मुकुट घालणार आहे. किंग चार्ल्सच्या या मुकुटाचे नाव सेंट एडवर्ड्स असे आहे. हा मुकुट 1661 मध्ये दुसऱ्या किंग चार्ल्ससाठी बनवण्यात आला होता. त्यानंतर ब्रिटनच्या गादीवर बसणाऱ्या प्रत्येक राजाला हा मुकुट घालण्यात येतो.