क्रिकेटपटू पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2023 मध्येही त्याला काही खास कामगिरी करता आलेली नाही.
एकीकडे क्रिकेटमधील खराब फॉर्ममुळे संकटात सापडलेल्या पृथ्वी शॉच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सपना गिल सेल्फी वाद प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉला नोटीस पाठवली आहे.
पृथ्वी शॉसह 11 जणांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आता त्यांना लवकरात लवकर उत्तर द्यावं लागणार आहे.
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पृथ्वी शॉचा एका तरुणीसोबतचा बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मुळात सेल्फी घेण्यावरून हा वाद सुरु झाला होता, मात्र आता हा वाद न्यायालयात पोहोचला आहे.
पृथ्वी शॉने सपना गिलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर सपना गिलला तुरुंगात जावं लागलं. त्यानंतर तिला या प्रकरणी जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर सपनाने पृथ्वीच्या अडचणी वाढवल्या आहेत.
तिच्यावरील दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यानंतर सपनाच्या मागणीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉसह 11 जणांना नोटीस पाठवली आहे.
सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला.
सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तिच्या अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.