हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आज (11) 80वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बी आजही आपल्या दमदार अभिनयाने आणि अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.



दीर्घकाळ अभिनय विश्वात सक्रिय असलेले अमिताभ वयाच्या या टप्प्यावरही अनेक तरुण अभिनेत्यांना तगडी टक्कर देतात. वक्तशीर आणि शिस्तप्रिय असणारे अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही लोकांमध्ये कायम आहे.



मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत सर्वत्र अमिताभ यांनी स्वत:ला महानायक म्हणून सिद्ध केले आहे. अमिताभ बच्चन गेल्या 22 वर्षांपासून रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.



आज करोडोंच्या संपत्तीचे मालक अमिताभ बच्चन या शोच्या एका सीझनसाठी भरमसाठ फी आकारतात. रिपोर्टनुसार, पहिल्या सीझनमध्ये बिग बी प्रत्येक एपिसोडसाठी 25 लाख रुपये घेत होते. तर, आता त्यांची फी प्रति एपिसोड 4 ते 5 कोटी रुपयांवर गेली आहे.



अमिताभ बच्चन फिल्मी पडद्यासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. तरुणाईचा बालेकिल्ला म्हटला जाणारा सोशल मीडियाही अमिताभ बच्चन यांच्यापासून दूर राहू शकलेला नाही.



दररोज ते ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्याच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्टेड राहतात. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.



फेसबुकवर 39 दशलक्ष, ट्विटरवर 48 दशलक्ष आणि इंस्टाग्रामवर 3.03 दशलक्ष लोक अमिताभ बच्चन यांना फॉलो करतात. अमिताभ बच्चन नियमितपणे त्याचा ब्लॉग देखील लिहितात, जो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतो.



अमिताभ बच्चन नुकतेच ‘गुडबाय’ या चित्रपटात झळकले आहेत. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना आणि नीना गुप्ता दिसल्या आहेत. या चित्रपटातून रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.



अमिताभ बच्चन लवकरच ‘अलई’, ‘गणपत पार्ट वन’, ‘तेरा यार हूं मैं’, ‘द इंटर्न’ आणि ‘घूमर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.