टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू महावितरणच्या गलथान कारभारामुळेच झाला असल्याचा आरोप संतोषच्या नातेवाईकांनी केला आहे.



चांगला अभिनय करायला चांगला चेहरा लागतो, उंची लागते, रंग लागतो, चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजेत. पण टिकटॉकनंतर अभिनयासंदर्भातली ही सगळी गृहीतकं मोडीत निघाली.



जन्मानं नशिबी आलेलं व्यंग. स्पष्ट बोलता येत नव्हतं. तासभर उन्हामध्ये उभं राहणंसुद्धा ज्याला मुश्किल होतं, असा संतोष मुंडे नावाचा तरुण स्वतःच्या मोबाईलवर व्हिडीओ करू लागला. रातोरात सुपरस्टार बनला.



वेब सिरीजच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर जाण्याच स्वप्न पाहणाऱ्या याच सुपरस्टार संतोष मुंडेचा अपघाती मृत्यू झाला आहे.



संतोष मुंडेचं वय वर्ष 35, बीड जिल्ह्यातल्या डोंगरात वसलेल्या धारूर जवळच्या भोगलवाडी गावात संतोष मुंडेंचा जन्म झाला. वडील निवृत्त सैनिक. अभिनयाची आवड असलेल्या संतोषची ओळख सगळीकडे संत्या म्हणूनच होती.



घरात कुठलाही अभिनयाचा वारसा नसल्यानं संतोषनं टिकटॉक सुरू केलं आणि व्हिडीओ करायला सुरुवात केली. तिथूनच टिकटॉकवरील व्हिडीओंच्या माध्यमातून संतोष घराघरात पोहोचला.



सुरुवातीला संतोषचे व्हिडीओ बघून लोक त्याला हसायचे. अनेकजण नाव ठेवायचे. तुला नीट बोलता तरी येतं का? असं म्हणून हिणवायचे. मात्र हे ऐकूनसुद्धा संतोष कधी थांबला नाही. कधी शेतात, कधी डोंगरावर, कधी रस्त्यावर, कधी कुठल्या कार्यक्रमात तो कायम व्हिडीओ तयार करायचा.



संतोष मुंडे आणि त्याचा पुतण्या बाबुराव मुंडे हे दोघेजण जनावर घेऊन घरी येत होते. त्यावेळी विजेच्या उघड्या डिपीजवळ गेलेल्या जनावरांना परत आणण्यासाठी गेलेल्या बाबुराव मुंडे यांला उघड्या असलेल्या लाईटच्या डीपीला शॉक लागला. बाबुरावला शॉक लागल्यानंतर संतोष त्याला वाचवण्यासाठी गेला.



पाऊस पडल्यानं ओलावा निर्माण झाला होता. उघड्या केबल आणि ओलाव्यामुळे दोघांनाही जोराचा विजेचा धक्का लागला. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला



संतोष हा वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी कोणाकडूनही मानधन घेत नव्हता. अभिनयाची आवड असल्यानं त्याला मेहनत करून मोठ्या पडद्यावर झळकायचं होतं. त्यामुळे तो वेब सिरीजमध्ये कधी मुख्य भूमिकेत असायचा तर कधी दुय्यम भूमिकेत काम करायचा.