गेल्या काही वर्षात नामशेष होत चाललेल्या बदलापूरच्या जांभळाला (Baldapur Jambhul) नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न बदलापुरात सुरू झाला आहे.
जांभळाला भरभराटीचे दिवस आणि भौगोलिक नामांकन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात एक आशादायक माहिती समोर आली आहे.
भाभा अणूशक्ती संशोधन संस्थेच्या (Homi Bhabha Centre For Science Education) अहवालात बदलापुराच्या जांभळात अँथोसायनीन आणि अँन्टी ऑक्सिडंट आढळून आले आहे. त्यामुळे हे जांभूळ गुणवत्तापूर्ण मानले जाते आहे.
बदलापूर शहर आणि आसपासच्या गावात मिळणाऱ्या जांभळाच्या जातीचे पाच प्रकार भाभा अणूशक्ती संशोधन केंद्रात पाठवण्यात आले होते.
केंद्राच्या अन्न तंत्रज्ञान विभागात या जांभळांच्या दर्जाची तपासणी करण्यात आली.
यात गरवी प्रकरातील जांभूळ मांजर्ली, वालिवली, बोराडपाडा आणि कोंडेश्वर परिसरातून संकलित करण्यात आले होते.
या जांभळांच्या भौतिक, जैवरसायन आणि अँन्टी ऑक्सिडंट अशा तीन पातळ्यांवर त्याची तपासणी करण्यात आली होती.
याचा पहिला अहवाल नुकताच यासाठी काम करणाऱ्या जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टला प्राप्त झाला.
या अहवालानुसार या जांभळामध्ये ‘अँथोसायनीन’ चे प्रमाण अधिक असल्याचे समोर आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आदित्य गोळे यांनी दिली आहे.
यामुळे जांभळाचा रंग अधिक गडद असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.