दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते आर्चबिशप डेसमंड टूटू यांचं रविवारी निधन झालं.
ते 90 वर्षांचे होते. त्यांना देशाचा Moral Compass असं म्हटलं जायचं.
टूटू यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी टूटू यांना आदरांजली अर्पण केली आहे.
संपूर्ण जगभरात वर्णभेदाविरोधातील लढाईचं प्रतिक राहिलेल्या नेल्सन मंडेला यांचे डेसमंड टूटू हे समकालीन होते.
वर्णभेद आधारित भेदभाव तसंच फुटीरवादी धोरण नष्ट करण्याच्या आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग होता.
वर्णभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी त्यांना नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं.
1970 च्या दशकात एका युवा पादरीच्या भूमिकेसोबतच ते दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी सरकारच्या विरोधकांपैकी एक होते.
1986 मध्ये डेसमंड टूटू यांनी केपटाऊनच्या आर्चबिशप पदाची जबाबदारी स्वीकारली.
त्याच्या तब्बल दहा वर्षांनी त्यांनी ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचं अध्यक्षपदही भूषवलं.