अमरनाथ यात्रा सुरु होण्यास अजून महिना बाकी आहे. अशा परिस्थितीत पवित्र अमरनाथ गुहेतून शिवलिंगाची छायाचित्रे समोर आली आहेत. गुहेमधील नैसर्गिक हिमलिंग पूर्ण आकारात बनलं असल्याचं या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. या फोटोंमध्ये पवित्र शिवलिंगासोबतच पार्वती आणि गणेशाचे प्रतीक मानले जाणारे हिमस्तिंबाही पूर्ण आकारात दिसत आहे. अमरनाथ यात्रा अधिकृतरित्या सुरु होण्यासाठी एक महिना शिल्लक असून अधिकारी आणि सुरक्षा दलाचे जवान गुहेत पोहोचले आहेत. यात्रेचा मार्ग तयार करण्याचे कामही जोरात सुरु आहे. श्राईन बोर्ड आणि सुरक्षा दलाचे अधिकारी बंदोबस्तासाठी गुहेत पोहोचले आहेत. यात्रेच्या मार्गावरील बर्फ साफ करण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. बर्फ कापून हा ट्रॅक प्रवाशांसाठी योग्य बनवला जात आहे. मागील वेळेच्या तुलनेत यंदा ट्रॅकवर झालेली बर्फवृष्टी अधिक आहे. अद्यापही संपूर्ण मार्गावर दहा ते वीस फूट बर्फ साचला आहे. यंदाची अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरु होत असून ती 29 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. सरकारने अमरनाथ यात्रेचे वेळापत्रक 10 एप्रिल रोजी जाहीर केले होते. ही यात्रा 62 दिवस चालणार आहे.