श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून इस्रोच्या आदित्य एल1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य यान सूर्याच्या दिशेने झेपावले. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. भारताच्या या मोहीमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. तसेच पीएसएलव्ही रॉकेटने या यानाला त्याच्या कक्षेत व्यवस्थित प्रस्थापित केलं असल्याची माहिती देखील इस्रोकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इस्रोच्या या यशासाठी अभिनंदन केलं आहे. हे यान 15 लाख किमी दूर जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे. यामुळे सूर्याच्या अनेक रहस्यांचा उलगडा करणं हे इस्रोला शक्य होईल. हे प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्रज्ञांनी देखील जल्लोष केला. तसेच हे प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.