बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज (1 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही तिच्या अभिनयापेक्षा जास्त वादविवादांमुळे चर्चेत राहिली आहे. रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून जवळपास 10 वर्ष उलटली असून, अजूनही अभिनेत्री एका सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेतच आहे. 1 जुलै 1992 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेल्या रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच 2013मध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'सोनाली केबल', ‘चेहेरे’, ‘जलेबी’, ‘बँक चोर’ यासारख्या हिंदी चित्रपटात दिसली. मात्र, रिया अजूनही बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी संघर्ष करत आहे. रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती बंगाली आहेत, तर आई संध्या मूळची कोकणी आहे. तिने 2009मध्ये छोट्या पडद्यावरील रियॅलिटी शो MTV TVS Scooty Teen Diva मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्यानंतर ती एमटीव्हीचे अनेक शो होस्ट करताना दिसली.