कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. आज (25 जून) ती आपला वाढदिवस साजरा करत आहे. आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही. अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते. करिश्मा चित्रपटांमुळे चर्चेत राहिलीच, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. करिश्माने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून अनेक चाहत्यांची हृदयं तोडली. संजय कपूरसोबतच्या नात्यामुळे अभिनेत्री करिश्मा कपूर चांगलीच चर्चेत आली होती. कुटुंबाची संमती नसतानाही तिने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले होते. करिश्मा कपूरने 1991मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.