मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे.
25 जून 1986 रोजी जन्मलेल्या सई ताम्हणकरचे मूळ गाव सांगली, महाराष्ट्र आहे. सई ताम्हणकर पहिल्यांदाच सांगलीत असताना नाटकांत सामील झाली होती.
तिने पहिल्यांदा तिच्या आईच्या मैत्रिणीच्या नाटकात काम केले होते.
सईला अभिनयाविषयी काहीही माहिती नसतानाही, तिने प्रयत्न करण्याचा विचार केला होता आणि यातूनच तिला नाटकाची गोडी लागली होती.
यानंतर तिने आणखी नाटकांमध्ये अभिनय केला आणि आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेत 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कारही जिंकला.
'या गोजिरवाण्या घरात', 'अग्नीशिखा', 'साथी रे' आणि 'कस्तुरी' या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्ये सई झळकली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले.
सई ताम्हणकरने सुभाष घई यांच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
लहानपणापासून खेळाची आवड असणारी सई ताम्हणकर ही राज्यस्तरीय कबड्डीपटू देखील आहे. इतकेच नव्हे, तर ती ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या महाराष्ट्रातील कुस्ती लीगमधील ‘कोल्हापुरी मावळे’ या कुस्ती संघाची मालक देखील आहे.
केवळ खेळच नाही, सई ताम्हणकर कराटेमध्ये देखील ऑरेंज बेल्ट आहे. अभिनेत्रीने मार्शल आर्टचा हा प्रकार छंद म्हणून शिकून घेतला होता.
‘गजनी’, ‘हंटर’, ‘मिमी’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमधूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.