Tokyo Olympics 2020 : Bhavani Deviने रचला इतिहास, तलवारबाजीचा सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला
Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात धमाकेदार झाली. भारताच्या सीए भवानी देवीनं इतिहास रचत ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजिजचा पराभव करत तलवारबाजीचा सामना जिंकला आहे. ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिली महिला खेळाडू आहे. भवानी देवी (CA Bhavani Devi) नं महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 64 सामन्यात 15-3 अशा फरकानं विजय मिळवला.
आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या भवानी देवीचा या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी ट्यूनिशियाच्या नादियावर दबदबा होता. भवानीनं सामन्याचा पहिला राउंड अगदी सहज 8-0 अशा फरकानं जिंकला. 27 वर्षीय भवानी देवीनं दुसऱ्या राउंडमध्येही ट्यूनिशियाच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही. दुसरा राउंडही भवानी देवीनं 7-3 अशा फरकानं आपल्या बाजूनं केला. भवानी देवीनं अवघ्या सहा मिनिटांत हा सामना आपल्या खिशात घातला. आता महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत होणार आहे.