India Vs England : भारत आणि इंग्लडमधील पाचवा कसोटी सामना रद्द
India Vs England : भारत आणि इंग्लडमधील पाचव्या कसोटी सामन्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मॅन्चेस्टर येथे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. शेवटच्या मॅचचा विजेता कोण यावर चर्चा सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडला विजेता घोषित केलं जाईल असं सांगण्यात येत होतं. भारताने इग्लंडला विजेता घोषित करण्यावर आक्षेप नोंदवला आहे. मॅच रेफरी आणि आयसीसी अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती आहे.
त्या आधी पहिल्या दोन दिवसांचा खेळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डने हा सामना दोन दिवस पुढे ढकलत असल्याची घोषणा केली होती. जर रविवारी हा सामना खेळवण्यात आला नाही तर हा सामना रद्द करण्यात येणार असल्याचंही इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डने स्पष्ट केलं होतं. आता हा सामनाच रद्द केल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
त्या आधी या सामन्याचा कमेंटेटर दिनेश कार्तिकने एक ट्वीट करत पहिल्या दोन दिवसांचा खेळ होईल की नाही यावर शंका उपस्थित केली होती.
भारतीय संघाचे सहाय्यक फिजियो यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर भारतीय संघाची ट्रेनिंग रद्द करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व भारतीय खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यांना हॉटेलमध्ये आयोसोलेट केले आहे. गुरुवारी यावर बोलताना भारतीय क्रिकेट बोर्डाचे प्रमुख सौरव गांगुली म्हणाले होते की, " पाचवा कसोटी सामना होईल की नाही या बाबत शंका आहे. हा सामना होण्याची शक्यता फारच कमी आहे."
संबंधित बातम्या :
- IND vs ENG 5th Test : भारत- इंग्लंड पाचवा कसोटी सामना रद्द होण्याची शक्यता, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले...
- Rashid Khan : राशिद खानचा अफगाणिस्तान क्रिक्रेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा; संघ निवडीमध्ये स्थान न दिल्याने निर्णय
- South Africa vs India : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर; कधी होणार पहिला सामना?