Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत आज विश्वविजेता टीम इंडियाचं (Team India) आगमन झालं. सायंकाळी 5 नंतर वर्ल्डकपविजेत्या टीम इंडियाचे सर्वच शिलेदार मुंबईतील विमानतळावर उतरले. त्यानंतर, मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियम असा प्रवास विशेष बसमधून करण्यात आला. यावेळी टीम इंडियाच्या स्वागताला मुंबईकरांनी (Mumbai) मोठी गर्दी केली होती. वानखेडे मैदानात, मैदानाबाहेर आणि मरीन ड्राईव्ह परिसरात अक्षरश: जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं. स्वत: मुख्यमंत्र्यांनी ह्या गर्दीमुळे पोलिस (Police) आयुक्तांना फोन करुन सूचना केल्या होत्या. दरम्यान, रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास चर्चगेट परिसरात आणि वानखेडे स्टेडियमबाहेर मोठी गर्दी झाल्याने काहीजण गुदमरल्याची माहिती मिळाली.
टीम इंडियाच्या स्वागतसाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. यावेळी, चर्चगेट स्थानकात मोठी गर्दी दिसून आली. याच गर्दीत काहींना अस्वस्थ होऊ लागल्याने तत्काळ रुग्णावाहिकेतून रुग्णालयातून नेण्यात आलं आहे. येथील गेट नंबर 2 च्या बाहेरही मोठी गर्दी दिसून आली. यावेळी, बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी अस्वस्थ झालेल्या तरुणीला आपल्या खांद्यावर उचलून बाजूला नेल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यावेळी, काही ठिकाणी पोलिसांकडून लाठी चार्जही करण्यात आला आहे.