ED Summons Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स, कार्यालयात हजर राहण्याची सूचना

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने काल (25 जून) पाच ठिकाणी झाडाझडती केल्यानंतर आज अनिल देशमुख यांना समन्स बजावला आहे. देशमुख यांना आज सकाळी अकरा वाजता दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात हा समन्स बजावण्यात आला आहे. ईडीने काल त्यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकले होते.

दरम्यान याआधी अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. मनी लॉण्ड्रिंग (PMLA) प्रकरणात ईडीने दोघांविरोधात ही कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (26 जून) सकाळी अकरा वाजता त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाईल. अनिल देशमुख यांच्यावरही ईडी कारवाई करु शकते, असं समजतं.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. ज्यावेळी याबाबत चर्चा सुरु होती, तेव्हा त्या खोलीत अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे देखील उपस्थित होते.

दरम्यान सत्ता गमावल्यामुळे वैफल्यग्रस्तांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सत्ताधारी पक्षातील विनाकारण त्रास दिला जात आहे, आम्ही सुद्धा पाहून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ईडीने काल (25 जून) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर छापा टाकून झाडाझडती केली. PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील  जीपीओ चौक परिसरातील निवासस्थानी तसंच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागवून अगदी एक एक ड्रॉवर तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथून देशमुख वरळीच्या घरी पोहोचले. वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे जबाब घेतले. 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram