अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या Rupali Chakankar यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे : गेले अनेक दिवस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. राज्य शासनकडून जीआर काढून नियुक्ती झाली असल्याबाबतची अधिकृतपणे घोषणा केली आहे. गेले दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होतं. विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकांना लक्षात घेता ही जागा लवकरच भरणार अशी चर्चा होती. यापूर्वी विजया रहाटकर या महिला आयोगाचे अध्यक्ष होत्या. रुपाली चाकणकर सोशल मीडियावर सक्रिय आहेत सोबतच त्या महिला अत्याचार प्रकरणावर नेहमी भाष्य करत असतात.
अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील हुकमी एक्का म्हणून या चेहऱ्याकडे पाहिलं जात आहे. तो चेहरा म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर. रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रतत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला.