Devendra Fadnavis PC | सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर : देवेंद्र फडणवीस
: "ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र आठ दिवस झाले, नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्टेटमेंटची अपेक्षा नाही. सरकारचा नाकर्तेपण झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा वर्षभरापूर्वीचा व्हिडीओही दाखवून त्यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली.
"अनेक ठिकाणी खरडून गेली आहे, माती वाहून गेली. तिथे पुढील पीक घेणं अशक्यप्राय आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष योजना हवी. मोबाईलने फोटो काढून पंचनामे उरका आणि तात्काळ मदत करा. जे धनादेश दिले, त्यातील रक्कम ही अतिशय कमी आहे. त्यामुळे सरकारने एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे," असा आरोपही फडणवीस यांनी केला.