Food Hike : खवय्यांना फटका, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
कुठल्याही गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं असेल तर हक्काचं ठिकाण असतं ते म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंट, पण आता हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाणंही खिशाला परवडणारं राहिलेलं नाही. कारण हॉटेल, रेस्टॉरंटमधील पदार्थांच्या किंमती 30टक्क्यांनी महागणार आहेत. इंधनदरवाढीपाठोपाठ, व्यावसायिक सिलेंडर दरातील वाढीचा फटका आता तुम्हा आम्हा खवय्यांनाही बसणार आहे. कारण, दैनंदिन खर्च भरुन काढण्यासाठी लवकरच हॉटेलातील खाद्यपदार्थाच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं हॉटेल चालकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काही काळ व्यवसाय बंद असल्यानं खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट झाली. त्यावेळची नुकसान भरपाई काढताना आणि व्यवसायात तग धरुन ठेवण्यासाठी खाद्यपदार्थाच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं शेट्टींनी म्हटलंय. त्यामुळे आता तुमचं हॉटेलातील डाईन-इनही महागणार आहे.