Exclusive | 'वडेट्टीवार खाजगीत म्हणतात, मराठा समाजाला ओबीसीत घ्या' : संभाजीराजे छत्रपती
उस्मानाबाद : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. यात आता खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. 'मंत्री विजय वडेट्टीवार बाहेर वेगळी भूमिका घेतात. वडेट्टीवार खाजगीत ओबीसीत मराठा समाजाला घ्या म्हणतात. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे', असं खळबळजनक वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.
ते म्हणाले की, वडेट्टीवार यांच्यामुळे मी फार दुःखी आहे. ओबीसी मधून आरक्षण नको हे मी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. वडेट्टीवार मला म्हणाले होते की ओबीसी मधून आरक्षण देण्यास तयार आहे. मी म्हणालो कृपया असे करू नका. वडेट्टीवार असं का वागत आहेत माहिती नाही, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, मी कधीही तलवार काढू असे म्हटले नाही. सारथी विषयी आणि माझ्याविषयी वडेट्टीवारांना आकस आहे. तोच पुन्हा बाहेर येतोय. महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सूरू आहे. त्यात सत्ताधारी पक्षातली काही मंडळी आहेत. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. वडेट्टीवार मला एक बोलले आणि आता दुसरं बोलतायत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. त्यांनी असं करू नये, त्यांनी माझं संपूर्ण भाषण ऐकावं, असं संभाजीराजे म्हणाले.
तलवार कुणा विरोधात उपसणार? मंत्री विजय वडेट्टीवार यांचा संभाजीराजे यांना सवाल
तर मला छत्रपतींचा वंशज म्हणवण्याचा अधिकार नाही
ते म्हणाले की, एमपीएससी परीक्षेच्या बाबतीत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील, तरीही परीक्षा झाल्या तर सकल मराठा समाज जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. जर बहुजन समाजाबद्दल माझ्या मनात काही असेल तर मला छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवण्याचा अधिकार नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे म्हणाले की, समाजातील लोक आक्रमक होते, आम्ही तलवार काढलीय, तुम्ही आदेश द्या म्हणत होते, मी म्हणालो तुम्ही काही करू नका, गरज पडली तर मी आहे. समाजाला शांत करण्यासाठी मी तसं बोललो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे.