Congress On BMC : बीएमसीसाठी काँग्रेसचा 100 दिवसांचा प्रोग्राम, 227 जागांसाठी प्रयत्न : भाई जगताप
मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रसने 100 दिवसांचा कार्यक्रम तयार केला असून त्या माध्यमातून लोकांना विश्वास देणार असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महापालिका निवडणुकीत पक्षाने किती जागा लढवायच्या हे हायकमांड ठरवेल पण आम्ही सर्व 227 जागा लढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं.
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा!
भाई जगताप म्हणाले की, "कॉंग्रेस पक्ष येत्या 100 दिवसात महापालिकेच्या सर्व 227 वार्डापर्यंत पोहचणार आहे. मागील 15 वर्षामध्ये आम्ही या वार्डामध्ये निवडणूक लढलो आहे. आता सर्व जागा लढवण्याची भूमिका आमची आहे. मागील काही वर्षांमध्ये जे लोक काँग्रेस सोडून गेलेत त्याची आम्ही घरवापसी करणार आहोत."
मुंबईत स्वबळावर लढणारी काँग्रेस नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडीबरोबर जाणार
भाई जगताप पुढे म्हणाले की, "मुंबईतील पाचशे स्क्वेअर फिटच्या घरांना टॅक्स माफ करण्यासंदर्भातला शासन निर्णय भारतीय जनता पार्टीने दोन वेळा काढून त्याचा फायदा हा निवडणुकीसाठी उचलला होता. तत्कालीन सरकारने जो शासन निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी या सरकारने करावी. तसेच मुंबई परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी माफिया मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यांच्यापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा करावा."
'मुंबई सेंट्रल टर्मिनस'ला 'नाना शंकरशेठ टर्मिनस' यांचेच नाव का?
भाई जगताप पुढे म्हणाले की, "जनगणना अधिनियमानुसार 10 वर्षानी आरक्षण बदलायचे. आता ते आरक्षण 5 वर्षांनी बदलते. 2012 नंतर दर 5 वर्षांनी वॉर्ड रचना बदलत आहे. त्यामुळे संबंधित परिसरात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं नुकसान होतय. हे नुकसान टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे दहा वर्षांनीच आरक्षणात बदल करावा अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे."
सध्या बोरिवली ईस्टमध्ये 92 कोटी खर्च करुन स्काय वॉक बांधण्यात येत आहे, त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या पूर्वी मुंबईत तयार झालेल्या स्काय वॉकचा वापर नागरिकांना किती होतो हा संशोधनाचा विषय आहे. मग हा स्काय वॉक का बनवला जात आहे ? त्याचा वापर कोणीही करत नाही, त्या ठिकाणी वेगळ्याच गोष्टी सुरु असतात. हा स्काय वॉक रद्द करा अशी मागणी देखील मुंबई काँग्रेसने केली असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं.