Panghrun Review : 'पांघरुण' - सिनेमा नाही तर शब्दांच्या पलिकडची कलाकृती आहे.
Panghrun Review : 'पांघरुण' या सिनेमासंदर्भात मी जेव्हा महेश मांजरेकर यांची मुलाखत घेतली होती तेव्हा ते म्हणाले होते की, हा सिनेमा म्हणजे माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम कलाकृती आहे. आणि जेव्हा मी हा सिनेमा पाहत होतो तेव्हा महेश मांजरेकरांचं ते विधान मला क्षणोक्षणी आठवत होतं. कमाल सिनेमा बनवला आहे. खरंच हा सिनेमा नाही तर शब्दांच्या पलिकडची कलाकृती आहे.
सिनेमाची आणि सिनेमातली प्रत्येक बाजू उजवी आहे. हजारात, लाखात असा एक सिनेमा असतो. 'पांघरुण' त्यात अगदी वरच्या क्रमांकावर आहे. 'इलुसा हा देह किती खोल डोह… स्नेह प्रेम मोह मांदियाळी' या ओळी म्हणजे या सिनेमाचं सार आहे. म्हणजे हा सिनेमा बा. भ. बोरकरांच्या कथेवर आधारित आहे, हे क्षणभर विसरलो तर या कथेनं या गाण्यांच्या ओळींना जन्म दिला की गाण्यांच्या शब्दांनी कथेला जन्म दिला? हे सांगणं कठीण होईल इतपत ते एकरुप झालं आहे.
इलुसा हा देह किती खोल डोह… किती खोल असू शकतो हा डोह… किती पदर असावेत…. किती भावना असाव्यात…. किती रंग असावेत… सारं एकाच देहातून जन्मलय, मग काय पाप आणि काय पुण्य? काय चूक आणि काय बरोबर?
ते सारे रंग, ते सारे पदर, त्या साऱ्या भावना हा सिनेमा आपल्यापुढे मांडतो आणि पाप -पुण्याची गणितं आता तुम्हीच सोडवा असं म्हणत संपतो. पडद्यावर जरी संपत असला तरी तुमच्या मनात या पांघरुणाची उब आणि धग कित्येक दिवस राहते.