Zero Hour Guest Centre : महिला अत्याचार थांबायचे कसे?सामाजिक कार्यकर्त्या Meena Naik यांच्याशी चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Guest Centre : महिला अत्याचार थांबायचे कसे?सामाजिक कार्यकर्त्या Meena Naik यांच्याशी चर्चा
विशाल गवळी नावाच्या एका नराधमानं कल्याणमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विशालला त्याच्या पत्नीनंच मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळं पोलिसांनी विशालसह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. त्या दोेघांनाही दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्याजवळच्या राजगुरुनगरमध्ये शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्यानं दोन चिमुकल्या मुलींची हत्या केली. त्या दोन मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून हा नराधम त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. तो एका मुलीवर अत्याचार करताना तिनं प्रतिकार केला. ओरडायला सुरुवात केली. त्यामुळं तो नराधम आचारी घाबरला आणि त्यानं तिची हत्या केली. हा सारा प्रकार दुसऱ्या चिमुकलीनं पाहिला. ती सर्वांना सांगेल या भीतीनं त्यानं तिचाही जीव घेतला. काही महिन्यांपूर्वी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांकडून बदलापूर रेल्वे स्थानकात आठ तास रेल रोको करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातील एका नामांकित शाळेत एका शिक्षकानं चिमुकल्या मुलांवर लैंगिक अत्याचार केले. या साऱ्या घटना मन सुन्न करून टाकत असतानाच थरकाप उडवणारी आणखी घटना पुण्यातील कोंढवा भागात घडली. दहा दिवसांपूर्वीच्या या घटनेत एका नऊ वर्षांच्या मुलानं तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. या सगळ्या घटना ऐकल्या तुमची आमची अवस्था काही सुचेनासं होणारी होती. एक माणूस म्हणून आपण कुठे चाललोय, असा प्रश्न पडतो. आज आपल्या अनेकांच्या घरात मुली आहेत. कुणाच्या मुली अगदी लहान आहेत, कुणाच्या मुली तारुण्याच्या उंबरठ्यावर आहेत, कुणाच्या मुली लग्न होऊन नुकत्याच आपल्या सासरीही गेल्या आहेत. पण मुलगी चिमुरडी असो किंवा सज्ञान, ती कुठेच सुरक्षित नाही, असं का झालंय? घर, शाळा, कॉलेज, ऑफिस, ट्रेन, टॅक्सी, फुटपाथ, हॉटेल, सिनेमा थिएटर... यापैकी कुठली जागा उरलीय, जिथे मुलींवर अत्याचार होत नाहीयत?