Maharashtra Politics: स्थानिक निवडणुकींसाठी अजित पवार-शरद पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळेंच्या प्रस्तावावर खलबतं
abp majha web team | 12 Nov 2025 09:30 PM (IST)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पिंपरी-चिंचवड आणि चंदगडमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून युतीचा प्रस्ताव आल्याचा दावा केला आहे. बहल यांच्या मते, 'राष्ट्रवादी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यायला तयार आहेत.' यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी अजित पवार लवकरच शरद पवारांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले आहेत. मात्र, जेजुरीत शरद पवार गटाला धक्का बसला असून, त्यांचे नेते जयदीप बारभाई हे अजित पवार गटात सामील झाले आहेत. या घडामोडींमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. जालन्यात शिंदे सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपवर टीका केली आहे, तर काँग्रेसमध्येही नागपूर आणि नाशिकमध्ये गटबाजी उफाळून आली आहे.