Zero Hour : विरोधकांच्या तक्रारी,आयोगाच्या दारी; शिष्टमंडळाची आयोगावर प्रश्नांची सरबत्ती
abp majha web team | 14 Oct 2025 08:50 PM (IST)
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला EVM, VVPAT आणि मतदार याद्यांमधील त्रुटींवरून जाब विचारला. 'तुम्हाला फ्रॉड करायचा आहे', असा थेट आरोप करत राज ठाकरे यांनी VVPAT शिवाय निवडणुका घेण्याच्या आयोगाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. मतदार याद्यांमध्ये एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असणे, वडिलांपेक्षा मुलाचे वय जास्त दाखवणे अशा गंभीर चुका असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. यावर निवडणूक आयोगाने अधिक माहिती घेण्यासाठी वेळ मागितला असून, उद्या पुन्हा बैठक होणार आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे हे आरोप म्हणजे 'रडीचा डाव' असल्याचे म्हटले आहे. तर बच्चू कडू यांनी EVM आणण्याचे श्रेय काँग्रेसचेच असल्याचे सांगत, आता भाजप त्याचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा टोला लगावला आहे.