Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी निघालेल्या भीम अनुयायांच्या चुनाभट्टी-सायन कनेक्टरजवळ अडवण्यात आलेल्या रिक्षा अखेर सोडण्यात आल्या. यावेळी पोलीस आणि अनुयायांमध्ये मोठा वाद झाल्याने मुंबई पूर्व द्रुतगती मार्ग अडवण्यात आल्याचं दिसून आलं. जोपर्यंत आमच्या रिक्षा पुढे जाऊ दिल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही रस्ता मोकळा करणार नाही असा इशारा भीम अनुयायांनी दिला. या ठिकाणी ट्रक आडवा लावण्यात आला असून रस्ता अडवण्यात आला आहे. एका दिवसासाठी आम्हाला चैत्यभूमीकडे (Dadar Chaitya Bhoomi) जाऊ द्यावे अशी मागणी या अनुयायांनी केली. शेवटी पोलिसांनी या रिक्षांना पुढे जाण्यास परवानगी दिली.
तुर्भेवरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आले होते, त्यांना सायनच्या पुढे जाऊ दिले जात नव्हते. या रस्त्यावरुन रिक्षा जायला परवानगी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर आम्ही दर वर्षी चैत्यभूमीला जातो, पण यंदाच आम्हाला काय अडवलं जात आहे असा सवाल अनुयायांनी केला.
या ठिकाणी पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये मोठा संघर्ष झाल्याचं दिसून आलं. यावेळी एका पोलिसाच्या पायावरुन रिक्षा गेल्याने तो जखमी झाला. एका दिवसासाठी नियम बाजूला ठेवला जाऊ शकतो. पण त्यासाठी पोलीस तयार नाहीत. त्यामुळेच या ठिकाणी वादावादी झाल्याचं दिसून येतंय.