Saat Barachya Batmya : 712 : कोकणातील आंबा ब्रिटनला ते कमी दरामुळे फुल उत्पादक रस्त्यावर : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणचा हापूस आंबा भौगोलिक निर्देशांक म्हणजेच जीआय मानांकन नोंदणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत कोकणातील १ हजार ६२५ बागायतदार आणि प्रक्रिया उद्योजकांनी हापूससाठी नोंदणी केली आहे. हापूस मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात असून दर चांगला मिळावा तसेच कोकणच्या हापूसची अस्सल चव खवय्यांना चाखता यावी यासाठी बागायतदारही जीआयकडे वळत आहेत. देशात जीआय मानांकन मिळालेली एकूण ४२० उत्पादने आहेत. महाराष्ट्रातील ३३ उत्पादनांना जीआय मानांकन मिळालं असून त्यात २५ शेती उत्पादनांचा समावेश आहे. कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याला जीआय प्रमाणपत्र देण्यासाठी कोकणातील ३ संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, केळशी परीस हापूस उत्पादक संघ आणि देवगड तालुका हापूस उत्पादक संस्थेचा समावेश आहे.यापूर्वी कर्नाटक, आंधप्रदेश किंवा गुजरातचा आंबा हापूस म्हणून विकला जायचा. त्यामूळे ग्राहकांची फसवणूक होत होती. कोकण हापूसला जीआय टॅग मिळाल्यामुळे असे प्रकार कमी होतील अशी अपेक्षा आहे.
केंद्र सरकारच्या गोबर-धन योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कडूस इथं स्वतंत्र प्रकल्प कार्यान्वित. गॅस आणि वीज निर्मितीमुळे ग्रामपंचायतीचा मोठा खर्च वाचणार. वर्षांला वीजेसाठी होणाऱ्या ८ ते १० लाख रुपयांची बचत होणार आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून जिल्ह्याला मिळाले ५० लाख रुपये. नाशिक आणि जळगाव पाठोपाठ अशा प्रकारचा प्रकल्प उभारणारा पुणे हा राज्यातील तिसरा जिल्हा ठरला आहे मात्र प्रत्यक्षात काम सुरु झालेला पुण्यातील प्रकल्प राज्यात पहिलाच असल्याची माहिती.
जालना जिल्ह्यातील परतूर इथं फुलांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुलं फेकून आपला संताप व्यक्त केला. गुलाब ,मोगरा,गलांडा यासह इतर फुलांना बाजारात पाच रुपये किलो भाव मिळतोय. यातून उत्पादन खर्च निघणे दूर, माल वाहतुकीचा खर्चही खिशातून करावा लागत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव. त्यामुळे रस्त्यावर फुलं फेकून देत सरकारचा निषेध देखील व्यक्त केला.
हापूस आंब्याची आणखी एक बातमी..अवकाळीची हजेरी आणि ऐन हंगामात आंबा बागांवर संकट आलं पण त्यातूनही वाट काढत आंबा बागायतदारांनी बागा जपल्या आणि त्यांना कष्टाचं फळही मिळतंय.
गुढी पाडव्याच्या दिवशी रत्नागिरीचा हापूस सातासमुद्रापार पोहोचला. १२०० किलो हापूसची खेप इंग्लंडला पोहचली. तेजस भोसले या युवकाने इंग्लडला हापूसचा व्यवसाय सुरु केलाय. मुळचा पुण्याचा तेजस गेली अनेक वर्षे इंग्लंडला वास्तव्य आहे. आंबा हंगामापुर्वी ते रत्नागिरी,सिंधुदुर्गमधील बागायतदारांना भेट देतात आणि निर्यातीचं नियोजन करतात.
तामिळनाडूत दही या शब्दावरुन राजकारण पेटलं. पाकीटावर इंग्रजीत कर्ड शब्दासोबत दही लिहिण्याचा पर्यायही FSSAI ने दिला होता. स्थानिक दुध उत्पादक संघाने त्यावर आक्षेप घेतला. त्याऐवजी तायिर हा स्थानिक शब्द वापरणार असल्याचं जाहिर केलं. हिंदीची मक्तेदारी खपवून घेणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी केलं. या वादात भाजपनेही उडी घेत FSSAI ला पत्र लिहिलं. अखेर खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला आपले नोटीफिकेशन मागे घेत स्पष्टीकरण द्यावं लागलं. तामिळनाडूसोबत कर्नाटकातही या नोटिफिकेशनला विरोध सुरु होता. दक्षिणेतील राज्य आपल्या मातृभाषेविषयी किती आग्रही आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा या दही प्रकरणावरुन आला.
ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. २१० पैकी ५५ साखर कारखाने सुरु आहेत. यावर्षीचा साखर हंगाम नेमका कसा राहिला याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश लटके यांनी.