मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये ई-सिम कार्ड देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ई- सिम कार्ड देण्याच्या नावाखाली अनोळखी नंबरवरुन व्हॉटसअप केला जातो. त्यावरुन ई- सिम कार्ड वापरण्यासंदर्भात व्यक्तींना माहिती दिली जाते. ई- सिम सक्रीय करण्यासाठी एसएमसवरुन कोड पाठवतोय, असं सांगितलं जातं. ओटीपी मिळाला की संबंधित व्यक्तीला दोन तीन दिवसात ई-सिम सक्रीय केलं जाईल, असं सांगतात, याशिवाय पारंपारिक सिम कार्ड दोन ते तीन दिवसात येईल, असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात वेगळं घडलेलं असतं. प्रत्यक्षात सिमकार्ड येत नाही. ई-सिमकार्ड देखील सक्रिय झालेलं नसतं.


नोएडातील एका महिलेच्या बाबत असाच प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे. ई सिमकार्डच्या नावाखाली व्हाट्सअपवरुन फोन करुन ओटीपी घेत त्या महिलेच्या बँक खात्यातील पैसे काढून घेण्यात आले. 7.40 लाखांचं कार लोन काढण्यात आलं. महिला पोलीस स्टेशनला गेली तोपर्यंत उशीर झाला होता. 
 
मुंबईत देखील एका उद्योजकाला अशा प्रकारे फसवण्यात आलं. सिम स्वॅपच्या नावाखाली त्याची 7.5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. सिम  स्वॅपमध्ये घोटाळा करणाऱ्यांनी सिमकार्डला त्यांचा क्रमांक कनेक्ट करण्यामध्ये टेलिकॉम प्रोवायडरशी संपर्क केला. त्यानंतर बँकेकडून पाठवण्यात येणारा ओटीपी मिळवला अन् खातं रिकामं केलं. उद्योजकानं  1930 या क्रमांकावर फोन केलं अन् 4.65 कोटी रुपये पुन्हा मिळवले. 


फोनमध्ये असलेल्या सिम कार्डद्वारे फोन करणे, मेसेज करणे, डेटा वापरणे अशा गोष्टी करता येतात. आता ई-सिम निघाली आहेत. सायबर गुन्हेगारांनी सिम कार्ड घोटाळा करत लोकांना फसवण्याचे प्रकार सुरु केले आहेत. 


सिम कार्ड घोटाळ्याचे प्रकार 


सिम ब्लॉक स्कॅम : या प्रकारात व्यक्तीला मेसेज येतो की त्यांचं सिम वेरिफिकेशन केलं नाही किंवा पैसे भरले नाही तर बंद होईल. त्याच मेसेजमध्ये फसवणूक करणारी लिंक असते त्यातून माहिती चोरण्यात येते. गुन्हेगार लोकांना पॅनिक करुन सत्यता पडताळण्याची संधी देत नाहीत. 


सिम स्वॅप : सायबर गुन्हेगार फिशिंग अटॅक करुन, सोशल इंजिनिअरिग, डाटा चोरुन माहिती मिळवतात. त्यातून नेटवर्क पुरवणाऱ्यांशी संपर्क साधतात. सिम कार्ड बदलून देण्याची मागणी करतात. नवं सिम सुरु झालं की बँकेचे ओटीपी त्यांना मिळतात. त्याचवेळी मूळ वापरकर्त्याचं सिम बंद झालेलं असतं, बँक खात्याचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे गेलेला असतो.त्यातून पैसे काढून घेतात. 


सिम क्लोनिंग : अत्याधुनिक टूल्सचा वापर करुन सायबर गुन्हेगार डेटा कॉपी करुन डुप्लीकेट सिम तयार करतात. त्यावरुन फोन कॉल, मेसेज पाठवतात.त्या सिमकार्डच्या द्वारे ते गुन्हेगारीचे प्रकार करतात. 


फेक केवायसी वेरिफिकेशन : सायबर गु्न्हेगार टेलिकॉम कंपन्यांचा प्रतिनिधी बोलत असल्याचं सांगून  एखाद्या व्यक्तीकडून  आधार क्रमांक, पॅन क्रमांक, केवायसी डिटेल्स सिम ब्लॉक होण्यापासून रोखण्याच्या नावाखाली मिळवतात. जर एखाद्यानं  माहिती शेअर केली, लिंकवर क्लिक केलं तर सायबर गुन्हेगारांना कंट्रोल मिळतो. यामुळं आर्थिक संकट उभं राहू शकतं.


सिम कार्ड स्कॅम कसे ओळखावेत ?


कोणताही इशारा न देता नेटवर्क गेल्यास स्कॅमर्सने त्या क्रमांकाचा कंट्रोल घेतल्याचं स्पष्ट होतं. 


तुम्ही विनंती न करता तुम्हाला ओटीपी क्रमांक अथवा व्यवहाराचे अलर्ट येणं. 


संशयास्पद फोन  आणि मेसेज : केवायसी अपडेटस, आधार, पॅन आणि ओटीपी क्रमांक अनोळखी क्रमांकावरुन येणे. 


फेक सोशल मीडिया खाती : एखाद्याला फोन नंबरचा ताबा मिळाल्यास तो सोशल मीडिया खात्यात लॉगीन करण्याचा प्रयत्न करुन ते लिंक करण्याचा प्रयत्न करतो. 


सिम कार्डचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे गेल्यास अनपेक्षित ईमेल, मेसेज येतात. सोशल मीडियावर पोस्ट होतात. 


यापासून बचाव कसा कराल? 


टू फॅक्टर ऑथेनटिकेशन :बँकिंग आणि ईमेलची सुरक्षा वाढवण्यासाठी एसएमएस बेस्ड ओटीपी वापरण्याऐवजी गुगल ऑथेन्टिकेटरचा वापर करावा.


वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा.


आधार, पॅन, ओटीपी, बँकिंग संदर्भातील माहिती फोन क्रमांक, एसएमएस किंवा ईमेलवर शेअर करु नका. 


टेलिकॉम प्रोवायडर्स सिम स्वॅप साठी पिन  सेट करण्याची  परवानगी देतात त्यामुळं अधिक सुरक्षा मिळते. 


सिम स्वॅप विनंती नोटिफिकेशन आल्यास मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीला संपर्क करा. सिम बंद पडत असल्यास टेलिकॉम नेटवर्क प्रोव्हायडरला संपर्क करा. बॅकअप नंबर म्हणून ईमेल साठी दुसरा क्रमाकं वापरा. महत्त्वाची बँक खातील आणि ईमेल सुरक्षित राहील. एखादी संशयास्पद हालचाल दिसून आल्यास 1930 या क्रमांकावर कॉल करा किंवा सायबर क्राईमच्या http:www.cybercrime.gov.in ला भेट द्या.   


इतर बातम्या :