Elon Musk Vs Whatsapp: इलॉन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका ट्विटर कर्मचाऱ्याने व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आरोप केला होता. एका ट्विटर अभियंत्याने व्हॉट्सअ‍ॅप त्याच्या फोनच्या माईकचा अ‍ॅक्सेस घेऊन संभाषण ऐकत असल्याचा दावा केला. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असे मस्क म्हणाले होते. मात्र आता त्यांनी यातून स्वत:चा फायदा साधला आहे. ट्विटर (Twitter) लवकरच व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलचे फिचर्स घेऊन येणार आहे.


ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क इलॉन मस्क यांना ट्विटर अधिकाधिक यूजर फ्रेंडली बनवायचं आहे. यासाठी इलॉन मस्क यांच्याकडून ट्विटरमध्ये वारंवार बदल करण्यात येत आहेत. आता ट्विटर व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलचे (Audio and Video Call) फिचर्स आणणार आहे, असे करुन ट्विटर थेट व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. 


व्हॉट्सअ‍ॅपवर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स दोन्ही करता येतात. व्हॉट्सअ‍ॅपवरून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करणे पूर्णपणे विनामूल्य आहे, त्याप्रमाणे लवकरच ट्विटरसुद्धा वापरकर्त्यांसाठी ही सुविधा घेऊन येणार आहे. 


कदाचित ट्विटरवरून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करण्यासाठी पैसे आकारले जाऊ शकतात. ट्विटर आधीच सबस्क्रिप्शन मोडवर चालत आहे. म्हणजे, ट्विटरच्या काही खास फिचर्सचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला ट्विटरचे सदस्यत्व (Membership) घेणे आवश्यक असते.


ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉलमधला फरक काय?


आता प्रश्न पडतो की ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉलमध्ये काय फरक आहे? तर, व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरची आवश्यकता असते. याचा अर्थ, तुम्ही इतर कोणत्याही देशातील व्यक्तीला व्हिडीओ कॉल करत असाल तर तुमच्याकडे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असणे आवश्यक असते, तरच तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल करू शकता. मात्र ट्विटरवर व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरची गरज भासणार नाही. ट्विटर वापरकर्ते जगभरातील कोणत्याही देशातील कोणत्याही व्यक्तीला सहज ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकतील.


इतर कोणीही ऐकू शकणार नाही कॉल


व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच ट्विटरचे व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल्स एन्क्रिप्टेड (Encrypted) असतील. म्हणजे कोणतीही तिसरी व्यक्ती ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल ऐकू किंवा रेकॉर्ड करू शकणार नाही. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी याआधी एका ट्वीटमध्ये म्हटले होते की, माझी इच्छा असली तरी मी कोणाचा व्हिडीओ किंवा कॉल ऐकू शकत नाही.


हेही वाचा:


WhatsApp Investigation: गोपनीयतेचे उल्लंघन केल्याने व्हॉट्सअ‍ॅपची होणार चौकशी, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची माहिती