मुंबई : जर तुम्ही नोकिया फोन (Nokia Smartphone) वापरत असाल, किंवा त्यांचा वापर केला असेल, तर तुम्हाला माहित असेल की नोकिया स्मार्टफोन आणि फीचर्स बनवणाऱ्या कंपनीचे नाव HMD ग्लोबल आहे. या कंपनीने गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा युजर्सना नोकिया फोन बाजारात दिसणार नसल्याची शक्यता आहे. एचएमडी ग्लोबलने जाहीर केले आहे की आता त्यांचे स्मार्टफोन नोकियाच्या ब्रँडिंगसह लॉन्च केले जाणार नाहीत तर त्यांच्या वास्तविक ब्रँड म्हणजेच एचएमडीच्या ब्रँडिंगसह लॉन्च केले जातील. याचा अर्थ असा की आता युजर्सला बाजारात कोणत्याही स्मार्टफोनवर Nokia लिहिलेले दिसणार नाही.
HMD ने नोकिया ब्रँडिंग का काढून टाकले?
काही काळापासून एचएमडी ग्लोबल सतत अशा अनेक गोष्टी करत होते, ज्यामुळे नोकिया स्मार्टफोन्स आता बाजारात लॉन्च होणार नाहीत असा अंदाज वर्तवला जात होता. HMD ने नोकिया ब्रँड देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट अर्थातच ट्वीटरवरुन काढून टाकले आहे. दरम्यान HMD कडून सातत्याने त्यांच्या स्वत:च्या नावावर ब्रँडिंगसाठी जास्त भर दिला जात होता.
यापूर्वी Nokia.com असं या ब्रँडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिण्यात आले होते. परंतु आता HMD.comचा उल्लेख तेथे करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आता अशी अपेक्षा आहे की मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2024) मध्ये नोकियाच्या जागी HMD स्वतःच्या ब्रँडिंगसह नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते.
आता नोकियाचं काय होणार?
दरम्यान आता नोकियाच्या स्मार्टफोनची गोष्ट पुन्हा एकदा संपणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच यापूर्वी मायक्रोसॉफ्ट नोकियाचे स्मार्टफोन विकत होती, जे विंडोज ओएसवर काम करत होते. नोकिया लुमिया मालिका ही मायक्रोसॉफ्टची लोकप्रिय स्मार्टफोन मालिका होती, परंतु नंतर मायक्रोसॉफ्टने नोकिया ब्रँडचे हक्क एचएमडी ग्लोबलला विकले.तेव्हापासून HMD नोकियासाठी स्मार्टफोन बनवत होते.
तसेच एचएमडीने स्पष्टपणे सांगितले आहे की, भविष्यातही नोकिया स्मार्टफोन्सची निर्मिती होत राहील. त्याला त्याच्या मूळ ब्रँड एचएमडीला एक नवीन ओळख द्यायची आहे आणि म्हणूनच तो त्या ब्रँडचे स्मार्टफोन लॉन्च करत आहे. मात्र, नोकियाचे स्मार्टफोन आणि फीचर फोन बनत राहतील.त्यामुळे आता नोकियाचे स्मार्टफोन बाजारात येणार की नाही हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.