मुंबई : गुगल (Google) आपल्या युजर्सच्या गोपनीयतेसाठी महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. यासाठी गुगल मॅप्समध्ये (Google Maps) एक अपडेट केले जाणार आहे. ज्यामुळे तुमची गोपनीयता आणखी वाढण्यास मदत होईल. तसेच सरकारला देखील तुमचे लोकेशन कळू शकणार नाही. गुगल मॅपमध्ये सध्या येणाऱ्या या अपडेटविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
युजर्सची प्रायव्हसी वाढवण्यासाठी प्रयत्न
गुगलने नुकत्याच केलेल्या एका घोषणेमध्ये या अपडेटची माहिती दिली. गुगलच्या म्हणण्यानुसार, मॅप्स सेवेच्या या अपडेटनंतर, गुगल मॅप्सची लोकेशन हिस्ट्री अधिकार्यांना म्हणजे पोलीस इत्यादी कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांना उपलब्ध होणार नाही. गुगलच्या या अपडेटकडे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना हस्तक्षेपला आळा घालण्यासाठी आणि वापरकर्त्यांची गोपनीयता वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
3 महिन्यांचा डेटा होणार स्टोर
गुगल मॅप्सच्या लोकेशन हिस्ट्रीला टाइमलाइन म्हणून ओळखला जाते. सध्या ते क्लाउडवर साठवले आहे. यासंदर्भात गुगलने आपली धोरणे बदलली आहेत. बदलानंतर, वापरकर्त्यांना त्यांची लोकेशन हिस्ट्री म्हणजेच टाइमलाइन क्लाउडवर स्टोअर करण्याऐवजी डिव्हाइसमध्येच स्टोअर करण्याची सुविधा मिळेल. यासोबतच गुगल डेटा रिटेन्शन पॉलिसीमध्येही बदल करत आहे. या अंतर्गत डेटा ठेवण्याचा कालावधी कमी केला जात आहे. बदलानंतर, Google मॅपचा डेटा केवळ तीन महिन्यांसाठी संग्रहित केला जाईल.
निवडक लोकेशन करता येणार डिलीट
याशिवाय गुगलच्या मॅप्स सेवेतील आणखी एक मोठा बदल म्हणजे निवडक डेटा डिलीट करण्याची सुविधा. आता गुगल आपल्या वापरकर्त्यांना विशिष्ट स्थानाशी संबंधित इतिहास हटविण्याची सुविधा देखील देईल. गुगल आधीच लोकेशन सक्षम-अक्षम करण्याची सुविधा देत आहे. आता वापरकर्ते लोकेशन सर्व्हिस चालू ठेवल्यानंतरही ती पूर्णपणे नियंत्रित करू शकतील. हे वापरकर्त्यावर अवलंबून असेल की त्याला त्याचा डेटा किती प्रमाणात साठवायचा आहे.
नव्या वर्षात मिळणार नवे अपडेट
Google चे हे अपडेट लवकरच Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. गुगलचे हे मॅप अपडेट पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे. जिओफेन्स वॉरंटच्या वाढत्या गैरवापरामुळे असा बदल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.जगभरातील अधिकारी जिओफेन्स वॉरंटद्वारे लोकांच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप कर आहेत, त्यामुळे ही मागणी वारंवार केली जात होती. गुगलने अखेर याची अंमलबजावणी केली आहे.