Who is  Altina Tina Schinasi? : आपल्यापैकी अनेकजण किंबहुना आपण सर्वच रोज कितीतरी वेळा गुगल सर्च करतो. बदलत्या टेक्नॉलॉजीच्या काळात इंटरनेट काळाची गरज झाली आहे. एखाद्या साध्या प्रश्नाचं उत्तर जरी शोधायचं असेल तरी आपण अगदी सहज गुगलची मदत घेतो. एरव्ही गुगलचा लोगो लाल, हिरवा, निळ्या अशा रंगात ठेवला जातो. मात्र, अनेकदा गुगल डूडलद्वारे हा लोगो बदलण्यातही येतो याला Google Doodle म्हणून ओळखले जाते. डूडल कंपनी अशा महान लोकांचा शोध घेते ज्यांनी समाजासाठी काही महान कार्य केले आहे आणि लोकांनी त्यांचे कौतुक केले आहे. आज जर तुम्ही गुगल सर्च केले तर तुम्हाला चष्म्याच्या मागे एका महिलेचा फोटो दिसेल.


आता ही महिला नेमकी कोण? आणि गुगलने आज यांचा लोगो लावून खास शुभेच्छा का दिल्या? असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविकच आहे. तर, डूडलमध्ये तुम्हाला दिसत असलेल्या महिलेचे नाव अल्टिना शिनासी आहे. गुगल आज त्यांची जयंती साजरी करत आहे.


अल्टिना शिनासी या कोण आहेत?


खरंतर, अल्टिना शिनासी एक प्रसिद्ध अमेरिकन कलाकार, डिझायनर आहेत. त्यांनी हार्लेक्विन चष्म्याच्या फ्रेमने चष्म्याच्या बाजारपेठेत एका नवीन क्रांतीला जन्म दिला आणि ही फ्रेम जगभर लोकप्रिय झाली. या चष्म्याच्या लोकप्रियतेनंतर, ते "कॅट-आय" फ्रेम म्हणून ओळखले जाऊ लागले. याच दिवशी, 4 ऑगस्ट, 1907 रोजी मॅनहॅटन, न्यूयॉर्क येथे अल्टिना शिनासी यांचा जन्म झाला. शिनासी यांचा कलात्मक प्रवास पॅरिसमध्ये सुरू झाला आणि फॅशन तसेच चित्रपटाच्या दुनियेत त्यांच्या सर्जनशील योगदानाने त्यांना नवीन ओळख मिळाली. 19 ऑगस्ट 1999 रोजी त्यांचे निधन झाले.


त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अल्टिना शिनासी यांनी पॅरिसमध्ये चित्रकलेची आवड जोपासली. न्यूयॉर्कमधील आर्ट स्टुडंट्स लीगमध्ये त्यांनी आपले कौशल्य आणखी सुधारले. अल्टिना यांच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा त्यांनी फिफ्थ अव्हेन्यूवरील अनेक स्टोअरमध्ये विंडो ड्रेसर म्हणून काम केले. या काळात, त्यांना साल्वाडोर डाली आणि जॉर्ज ग्रोझ यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळे त्यांच्या कलात्मक दृष्टीवर खूप प्रभाव पाडला.


अशी सुचली "कॅट-आय" फ्रेमची कल्पना 


विंडो डिस्प्ले डिझायनर म्हणून त्यांच्या कार्यकाळात अल्टिना शिनासी यांना "कॅट-आय" चष्म्याच्या फ्रेमची कल्पना सुचली. महिलांसाठी चष्म्याच्या फ्रेम्सच्या बाबतीत फारसे पर्याय उपलब्ध नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी या दिशेने काम सुरू केले. मांजरीच्या डोळ्यांसारख्या दिसणाऱ्या या फ्रेमसाठी, त्यांनी इटलीतील व्हेनिस येथील कार्नेव्हेल उत्सवादरम्यान परिधान केलेल्या हार्लेक्विन मास्कपासून प्रेरणा घेतली आणि पहिला नमुना तयार केला. हा पहिला नमुना कागदाचा होता. सुरुवातीला त्यांना खूप अडचणी आल्या पण काही वेळाने शोध घेतल्यानंतर त्यांना एका दुकानदाराने संधी दिली आणि त्यांची रचना खूप लोकप्रिय झाली. 1930 आणि 1940 च्या दरम्यान त्याच्या हार्लेक्विन चष्म्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि स्त्रियांसाठी ती एक प्रतिष्ठित फॅशन बनली. आजही कॅट-आय फ्रेम्स बाजारात खूप लोकप्रिय आहेत.