पुणे : 'झी टॉकिज' आणि 'कलर्स मराठी' वाहिन्यांमध्ये कुस्ती स्पर्धेवरुन वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे.


दोन स्पर्धक वाहिन्यांवर एकाच वेळी सारख्या पद्धतीचे रिअॅलिटी शो भरवले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही डान्स, संगीत, विनोद अशा विषयांवरील रिअॅलिटी शो दोन वेगवेगळ्या चॅनल्सवर एकाच वेळी प्रक्षेपित झाले आहेत.

'झी टॉकिज' महाराष्ट्र कुस्ती लीग आयोजित करण्याच्या तयारीत आहे, तर कलर्स वाहिनी 'रेसलिंग चॅम्पियनशिप' भरवणार आहे. या दोनपैकी कोणती लीग आधी भरवायची, यावरुन कुस्ती परिषदेत वाद निर्माण झाला. त्यानंतर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: त्यात लक्ष घातलं.

या विषयावर निर्णय घेण्यासाठी पवारांनी कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची खास सभा पुण्यात बोलवली होती. या सभेत दोन्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींसह परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुस्ती लीग आयोजित करण्याबाबतचे दोन प्रस्ताव कुस्तीगीर परिषदेकडे आलेले आहेत. दोन्हीचं स्वरुप वेगळं आहे. त्यामुळे दोन्ही आयोजित करायला हरकत नाही, असं शरद पवार म्हणाले. 'कोणती लीग आधी भरवायची आणि कोणती नंतर, हाच एक प्रश्न आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच निर्णय घेईल' असं पवारांनी सांगितलं.