औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU) सध्या अभ्यासाऐवजी गाजतंय ते फक्त आणि फक्त आंदोलनामुळे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे कार्यकर्ते कुलगुरु बी. ए. चोपडे यांच्या दालनात समोरासमोरच भिडले आणि विद्यापीठात एक नवा वाद सुरु झाला.
चक्क कुलगुरुंच्या दालनात कुठे पंख्यावर टॉवेल वाळत घातले आहेत, तर कुठे टीव्हीवर चड्डी वाळत घातली. विद्यार्थी कुलगुरुंच्या दालनातच जेवायलाही बसले. ही सगळी परिस्थिती कुलगुरुंच्या दालनातील आहे यावर विश्वास बसणार नाही. अभाविपने या पद्धतीने आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यापीठाच्या संशोधन वसतिगृहात अनेक विद्यार्थी बेकायदेशीरपणे राहतात, असा अभाविपचा आरोप आहे. वारंवार विद्यापीठ प्रशासनाला याबाबत माहिती दिली, मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही, म्हणून अशा पद्धतीने आंदोलन केलं, असा दावा अभाविपने केलाय.
अभाविपच्या या आंदोलनाला विरोध करायला आंबेडकरवादी संघटनाही सरसावल्या आणि कुलगुरूंच्या दालनातच कुलगुरूंच्या डोळ्यासमोर शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरु झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना पिटाळलं. आम्ही विद्यापीठासाठी आंदोलन केलं, त्यात गैर काय असा सवाल अभाविपचे कार्यकर्ते करत आहेत. उलट आमच्याच कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झाल्याचा अभाविपचा आरोप आहे.
दुसरीकडे आंबेडकरवादी संघटनांनी अभाविपचं हे आंदोलन म्हणजे सत्तेचा माज असल्याचा आरोप केलाय. अशा पद्धतीने आंदोलन करणं म्हणजे कुलगुरू आणि विद्यापीठाचा अपमान असल्याचं आंबेडकरवादी संघटनांचं म्हणणंय. यासाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कुलगुरूंना घेराव घातला आणि विद्यापीठात जोरदार घोषणाबाजी करत काही काळ विद्यापीठ बंदही पाडलं.
या आंदोलनाला आळा घालण्यासाठी अखेर पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आणि त्यांनी आंदोलकांना जायला सांगितलं. यानंतर आंदोलन काही प्रमाणात शांतही झालं. हे आंदोलन अजूनही संपलेलं नाही. आंदोलनाने आता एक नवा वाद पेटलाय. यात राजकारणही सुरु झालंय आणि काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून हे राजकारण असंच पेटत राहणार असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे अभ्यासाऐवजी काही दिवस विद्यापीठ परिसर आता आंदोलनांनीच धुमसत राहणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचा राडा
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
25 Sep 2018 02:53 PM (IST)
अभाविपने विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी कुलगुरुंच्या दालनात आंदोलन केलं. हे आंदोलन म्हणजे सत्तेचा माज असल्याचा आरोप करत आंबेडकरवादी संघटनांनीही याला विरोध केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -