क्रिकेट -
वन डे विश्वचषकात इंग्लंडनं मिळवलेलं पहिलंवहिलं विजेतेपद हे यंदाच्या वर्षात क्रीडाविश्वाचा केंद्रबिंदू ठरलं. अंतिम सामन्यात ऑईन मॉर्गनच्या इंग्लंडनं बाजी मारली असली तरी विल्यम्सनच्या न्यूझीलंड संघानं केलेल्या संघर्षानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहत शर्मा या दोन भारतीय शिलेदारांचा यंदाच्या वर्षात चांगलाच दबदबा राहिला. विराटनं यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात शतकांसह 2455 धावांचा रतीब घातला. तर रोहितनंही 2019 या वर्षात सर्वाधिक 2361 धावा फटकावल्या. विश्वचषकातही रोहितचा रुद्रावतार पाहायला मिळाला. रोहितनं त्या विश्वचषकात तब्बल पाच शतकं ठोकली. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीनं या वर्षात वन डेत सर्वाधिक ४२ विकेट्स घेतल्या. याशिवाय शमीसह दीपक चहर, जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादवनं हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवला.
टीम इंडियासाठी यंदाचं वर्ष समाधानकारक राहिलं. आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतला पराभव वगळता टीम इंडियाचं एकूण प्रदर्शन उत्तम ठरलं. वर्षभरात टीम इंडियानं 8 कसोटी, 28 वन डे आणि 16 टी ट्वेन्टी असे एकूण 52 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यात 35 सामन्यात विजय, 15 सामन्यात पराभव तर 2 सामने अनिर्णित राहिले.
बांगलादेशविरुद्धची डे नाईट कसोटी हे भारतीय क्रिकेटमधलं नवं पर्व ठरलं. कोलकात्यात 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुलाबी चेंडूवर पहिलाच कसोटी सामना खेळवण्यात आला.वर्षाअखेरीस टीम इंडियाला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिलं, वन डे क्रमवारीत दुसरं तर ट्वेन्टी ट्वेन्टीत पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
बॅडमिंटन-
बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूच्या जागतिक विजेतेपदाचा अपवाद वगळता भारताला यंदा मोठ्या यशानं हुलकावणी दिली. सिंधूनं ऑगस्टमध्ये भारताला बॅडमिंटनचं पहिलच जागतिक विजेतेपद मिळवून दिलं होतं. पण वर्षभरातल्या इतर 16 स्पर्धांमध्ये सिंधूला एकही विजेतेपद मिळवता आलं नाही.
भारताची फुलराणी सायना नेहवालसाठीही हे वर्ष निराशाजनक ठरलं. इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरीनला दुखापत झाली आणि विजेतेपदाचा मान सायनाला मिळाला. हे एकमेव जेतेपद सोडलं तर सायनाला वर्षभरात एकाही स्पर्धेची अंतिम फेरीही गाठता आली नाही.
पुरुष एकेरीत बी साईप्रणित जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. तर किदंबी श्रीकांतनं नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. यंदाच्या इंडिया ओपन बॅडमिंटनमध्ये त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
बॅडमिंटनमध्ये यंदाचं वर्ष गाजवलं ते खऱ्या अर्थानं लक्ष्य सेन, चिराग शेट्टटी आणि सात्विक रानकीरेड्डी या युवा खेळाडूंनी. लक्ष्य सेननं या वर्षात पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपदाला गवसणी घातली. तर सात्विक आणि चिराग या जोडीनं दुहेरीत भारताला थायलंड आणि ब्राझील ओपनमध्ये सुवर्णपदक पटकावलं.
कुस्ती -
कुस्तीसाठी 2019 हे वर्ष संमिश्र स्वरुपाचं ठरलं. बजरंग पुनियानं यंदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं. तर विनेश फोगाटनं जागतिक कुस्तीचं सुवर्णपदक पटकावलं. अवघ्या 20 वर्षांचा पैलवान दीपक पुनियानं ऑगस्टमध्ये जागतिक ज्युनियर कुस्तीचं विजेतेपदावर आपलं नावावर केलं. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय पैलवान ठरला. त्यासाठी त्याला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून यावर्षीचा जगातला सर्वोत्तम पैलवानानं सन्मानित करण्यात आलं.
नेमबाजी - महाराष्ट्राची नेमबाज तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबत यांच्यासह 15 नेमबाज 2020च्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. या वर्षात भारतीय नेमबाजांनी दमदार कामगिरी बजावली. मनू भाकर, सौरभ चौधरी, एलावेनील वेलारिवन, दिव्यांश पानवर, अंजुम मुदगिल या युवा नेमबाजांनी जागतिक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली.
टेबल टेनिस -
अनुभवी शरद कमलनंतर चेन्नईच्या जी साथीयननं भारतीय टेबल टेनिसमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गुणशेखरन साथीयननं जागतिक टेबल टेनिस क्रमवारीत यंदा टॉप 25 मध्ये स्थान मिळवलं. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच टेबल टेनिसपटू ठरला. साथीयननं यंदाच्या वर्षात जगातल्या अव्वल टेबल टेनिसवीरांना पराभवाचा धक्का दिल्ला.
अॅथलेटिक्स-
अॅथलेटिक्समध्ये या वर्षात प्रमुख खेळाडूंना दुखापतींनी चांगलच ग्रासलं. नीरज चोप्रा आणि हीमा दाससाठी हे वर्ष दुखापतींचं वर्ष ठरलं. हीमा दासनं पोलंड आणि झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदकं जिंकून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे हिमाला आशियाई चॅम्पियनशीपमधून माघार घ्यावी लागली होती. याचदरम्यान द्युती चंदनं युनिवर्सिटी गेम्समध्ये 100 मीटर शर्यतीचं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली धावपटू ठरली.
बॉक्सिंग -
मॅग्निफिशंट मेरी म्हणजेच भारताची अव्वल बॉक्सर मेरी कोमनं याही वर्षी आपला दबदबा कायम राखला. मेरीनं जागतिक बॉक्सिंगमध्ये कारकीर्दीतलं आठवं पदक पटकावलं. 36 वर्षांच्या मेरीनं कांस्य पदकाची कमाई करुन क्युबाच्या फेलिक्स सेवॉनचा सर्वाधित सात पदकांचा विक्रम मोडीत काढला. वर्षाच्या अखेरीस सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या निखात झरीनविरुद्धच्या लढतीतही मेरीनं 9-1 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पुरुषांमध्ये अमित पंघाल जागतिक बॉक्सिंगमध्ये रौप्य पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
टेनिस -
भारताचा युवा टेनिसपटू सुमीत नागल आणि महान रॉजर फेडररची यू एस ओपनमधली लढत हे भारतीय टेनिसमधलं यंदाचं वैशिष्ट्य ठरलं. नागलनं हा सामना गमावला, तरीही त्यानं पहिला सेट जिंकून फेडररला कडवं आव्हान दिलं होतं. अनुभवी लिअँडर पेसच्या नेतृत्वात भारतानं डेव्हिस करंडकात पाकिस्तानला धूळ चारली. भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झानं बाळंतपणानंतर पुन्हा एकदा टेनिस कोर्टवर परतण्याची घोषणा केली.