मुंबई : साताऱ्याचा लोकप्रिय पैलवान किरण भगतची पाठदुखी आणि कंबरदुखी बळावल्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तो खेळू शकणार नाही. जालन्यात 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे.
पण किरणला पाठदुखी आणि कंबरदुखीतून सावरण्यासाठी डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळं त्याला महाराष्ट्र केसरीतून माघार घ्यावी लागली आहे. किरण भगतचे वस्ताद काका पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परिणामी किरण भगतच्या हजारो चाहत्यांची निराशा होणार आहे.
गतवर्षी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत किरणला अभिजित कटकेकडून काही गुणांनी हार स्वीकारावी लागली होती. या लढतीत अभिजीतने किरणवर 10-7 अशी मात केली होती.