जयपूर/हैदराबाद : आगामी लोकसभेची 'सेमीफायनल' असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदानाला राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतदान सुरु आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी सकाळी 7 वाजता तर राजस्थानमध्ये 199 जागांसाठी सकाळी आठ वाजता मतदान सुरु झाले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली आहे.


दरम्यान, तेलंगणात दुपारी 3 वाजेपर्यंत 56.17 टक्के मतदान झालं. तर राजस्थानमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 59.68 टक्के मतदान झालं.


राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर' असून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत पणाला लागले आहे. मागील 20 वर्षांपासून राजस्थानमधील जनतेने एकदा एका पक्षाला सत्ता दिल्यानंतर दुसऱ्या वेळेला सत्तेपासून दूर ठेवले आहे. तर तेलंगणामध्ये टीआरएस आपली सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेससह माकप, टीजेएसशी मुकाबला करणार आहे. भाजपदेखील काही जागांवर लढत आहे.

लोकसभेच्या निवडणुकांआधी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्तीसगड, मिझोरम आणि मध्यप्रदेश निवडणुकांचे मतदान झाले आहे. आज राजस्थान आणि तेलंगणा राज्यातील मतदान झाल्यानंतर 11 डिसेंबरला या सर्व राज्यांचे निकाल हाती येणार आहेत.

राजस्थानात 200 जागांसाठी 51,687 मतदान केंद्रांवर निवडणूक होत असून, 130 जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगत आहे. तेलंगणामध्ये 119 जागांसाठी 32 हजार 815 केंद्रांवर मतदान होत असून, अंदाजे तीन कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.

पाचही राज्यांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या मंगळवारी, 11 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'लोकांचे सरकार' आणण्याचे आवाहन या निवडणुकीपूर्वी केले आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत आता बदल करण्याची वेळ आली असून हीच लढाईची वेळ आहे. आपल्याला मनापासून 'लोकांचे सरकार' आणण्यासाठी लढायचे आहे, असा संदेश दिला आहे. तर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी विकास, प्रगती  आणि समृद्धीसाठी 'साफ नियत-सही विकास' हा मूलमंत्र असलेलं सरकार निवडून देण्याचे आवाहन केले आहे.