नवी दिल्ली : टोकियो आलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया आगामी कुस्ती वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये सहभागी होणार नाही. टोकियो ऑलिम्पिक दरम्यान  बजरंगच्या डाव्या गुढघ्याला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला काही आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोडन नॉर्वे येथील ओस्लोमध्ये दोन ते 10 ऑक्टोंबर दरम्यान करण्यात आले आहे. जोपर्यंत पुनियाचा रिहॅब्लीटेशनचा कार्यक्रम पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्याला सराव करता येणार नाही.


ऑलिम्पिकच्या अगोदर पुनियाला जून महिन्यात दुखापत झाली होती. तेव्हा पुनियाने एमआरआय देखील केले होते. मुंबईच्या कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. दिनशॉ परदीवाला यांनी रिहॅब्लीटेशनचा सल्ला दिल्याची माहिती बजरंग पुनियाने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. त्यामुळे मला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होता येणार नाही.  बजरंगच्या गुढघ्याला दुखापत झाली होती तरी देखील  त्याने चांगली लढत दिली. कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकस्तानचा पैलवान डाऊलेट नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली आणि ऑलिम्पिकमध्ये  कांस्यपदक  कमावलं. 


बजरंग पुनियाला जॉर्जियाचे त्याचे प्रशिक्षक  शाको बेनटिनिडिस यांच्याकडे ट्रेनिंग सुरू ठेवायचे आहे. मात्र भारतीय कुस्ती महासंघाने त्याला अजून नवीन करार न  केल्याने बेनटिनिडिस  मायदेशी परतला आहे.  परदेशी प्रशिक्षकांबरोबर नवीन करार करण्याअगोदर कुस्ती महासंघ सर्व कुस्तीपटूंसोबत बैठक घेणार आहे.  


शाको  बेनटिनिडिस हे पुनियाचे पर्सनल कोच असून त्यांनी स्वत: तीन ऑलिम्पिक मेडल पटकावले आहेत. कोरोना काळात  बेनटिनिडिस  लॉकडाऊनमुळे जॉर्जियात आपल्या घरी अडकले होते. त्यावेळी मोबाईल व्हिडियो कॉल आणि व्हिडियो क्लिप्सच्या माध्यमातून त्यांनी पुनियाला ऑनलाईन धडे दिले.  बेनटिनिडिस यांनी पुनियाच्या शारीरिक फिटनेसोबतच त्याच्या मानसिक फिटनेसवरही लक्ष दिलं. त्यामुळे बजरंग पुनियाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने जोरदार पुनरागमन केलं आणि पदक पटकावलं.