World Weightlifting Championships 2022: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूनं आणखी एक मानाचा तुरा देशाच्या शिरपेचात रोवला आहे. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं आहे. कोलंबियामध्ये झालेल्या स्पर्धेत मीराबाईनं चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदकावर नाव कोरलं. जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील मीराबाईचे हे दुसरं पदक आहे. यापूर्वी 2017 मध्ये मीराबाईनं सुवर्णपदक जिंकलं होतं. 


28 वर्षीय मीराबाई चानूनं एकूण 200 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं आहे. तर हौ झिहुआने एकूण 198 किलो वजन उचललं. दरम्यान, चीनच्या जियांग हुआहुआनं 206 किलो वजन उचलून जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णभरारी घेतली आहे. 


नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी स्टार भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूसाठी हे पदक मिळवणं तसं सोपं नव्हतं. मीराबाईनं सुरुवातीच्या स्नॅचमध्ये 85 किलो वजन उचललं. दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो वजन उचललं. यानंतरच्या प्रयत्नात मात्र मीराबाई चानूनं 113 किलो वजन उचलून जियांग हुआहुआशी बरोबरी साधली.


दुखापतीसह मीराबाई स्पर्धेत सहभागी : प्रशिक्षक


मीराबाईच्या विजयानंतर तिचे प्रशिक्षक विजय शर्मा म्हणाले की, "या स्पर्धेसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे दडपण घेतलं नव्हतं. हेच वजन मीरा नेहमी सरावादरम्यान उचलते. पण आता आम्ही वाढलेल्या वजनानं सराव करणार आहोत." पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, सप्टेंबरमध्ये प्रशिक्षण सत्रादरम्यान मीराबाई चानूच्या मनगटाला दुखापत झाली होती. तिनं दुखापतीसह राष्ट्रीय खेळांमध्येही भाग घेतला होता आणि इथेही ती पूर्णपणे तंदुरुस्त नव्हती.


भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू


मणिपूरची राजधानी इम्फाल येथे राहणारी मीराबाई चानूचा जन्म 8 ऑगस्ट 1994 रोजी इम्फाळ येथे झाला. 26 वर्षांची मीराबाई चानूला लहानपणापासूनच तिरंदाजीची आवड होती आणि तिला त्यामध्ये करिअर करण्याची इच्छा देखील होती. पण आठवीनंतर तिचा कल वेटलिफ्टिंगकडे वळला आणि यातच पुढे जाण्याचा तिने निर्णय घेतला. खरं तर, इम्फालच्या वेटलिफ्टर कुंजराणीला प्रेरणा मानून चानूनेही वेटलिफ्टिंगमध्ये रस घ्यायला सुरुवात केली.


वयाच्या 11 व्या वर्षी चानूने स्थानिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले. नंतर, तिने आंतरराष्ट्रीय आणि आशियाई ज्युनिअर स्पर्धेत भाग घेऊन आपल्या वेटलिफ्टिंगच्या कारकीर्दीला सुरूवात  केली, जिथे तिने दोन्ही पदके जिंकली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


करो या मरोचा सामना, पण संघात स्टार फुटबॉलर रोनाल्डोच नाही; पोर्तुगालनं का बरं घेतला हा निर्णय?