FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA फुटबॉल विश्वचषक 2022 (FIFA World Cup) चा शेवटचा प्री-क्वार्टर फायनल सामना चर्चेत होता. सामना होता पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडचा. स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) नेतृत्त्वात मैदानात उतरलेल्या पोर्तुगालसाठी करो या मरोची परिस्थिती होती. या सामन्यात पोर्तुगालनं स्वित्झर्लंडचा 6-1 असा दारुण पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पण या सामन्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा स्टार्टिंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. या वृत्तान असंख्य फुटबॉलप्रेमींना आश्चर्याचा धक्काच बसला होता. याबाबत पोर्तुगालच्या फुटबॉल संघाचे मॅनेजर फर्नांडो सँटोस यांनी स्पष्टीकरण दिलं. हा त्यांच्या गेम प्लॅनचा भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
एकंदरीतच विश्वचषकातील करो या मरोची परिस्थिती आणि दुसरीकडे संघाचा कणा म्हणून ओळखला जाणारा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोच संघाबाहेर, हे पोर्तुगालच्या कट्टर चाहत्यांना काहीसं रुचत नव्हतं. रोनाल्डोचं स्टार्टिंग 11 मध्ये नसणं सर्वांनाच खटकत होतं. सोशल मीडियावर फुटबॉल चाहत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण कालच्या सामन्यात पोर्तुगालनं दमदार खेळी करत स्वित्झर्लंडला बाहेरचा रस्ता दाखवला. हा भीमपराक्रम केला पोर्तुगालच्या गोंकालो रामोसनं.
रोनाल्डोला स्टार्टिंग 11 मधून का वगळलं?
रोमांचक सामन्यानंतर पोर्तुगालचे व्यवस्थापक फर्नांडो सँटोस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "रोनाल्डोला बाहेर ठेवण्याचा निर्णय हा गेम प्लॅन होता. हे आम्ही आधीच सांगितलं आहे. यात गोंधळात टाकणारं काहीच नाही. प्रत्येक खेळाडूची भूमिका वेगळी असते आणि त्या भूमिकेनुसार गोष्टी ठरवल्या जातात."
"रोनाल्डोला स्टार्टिंग 11 मधून बाहेर ठेवल्यानंतर पोर्तुगालच्या संघात काहीतरी बिनसलंय, असे अंदाज बांधले जात होते. पण मॅनेजरनं स्पष्ट केलं की, असं काही नाही, या गोष्टी खेळासोबत घडतात. संघाच्या हिताचा निर्णय घेतल्यानं कोणालाच अडचण नाही. रोनाल्डो एक दिग्गज खेळाडू आणि उत्तम कर्णधार आहे.", असंही ते म्हणाले.
पोर्तुगालनं या सामन्यात रोनाल्डोऐवजी गोंकालो रामोसला संधी दिली. पोर्तुगालचा हा निर्णय संघासाठी फायदेशीर ठरला. या सामन्यात गोंकालो रामोसनं तीन गोल केले. स्टार फुटबॉलर रोनाल्डो खेळाच्या 72व्या मिनिटाला जोआओ फेलिक्सच्या जागी टाळ्यांच्या कडकडाटात मैदानात आला. तोपर्यंत पोर्तुगालनं सामना पूर्णपणे आपल्याकडे खेचून आणला होता.
दरम्यान, पोर्तुगालनं फिफा विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. मंगळवारी (6 डिसेंबर) रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोर्तुगालनं स्वित्झर्लंडचा 6-1 असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा सामना मोरोक्कोशी होणार आहे. मोरोक्कोनं फ्रान्सचा पराभव करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. पोर्तुगालच्या संघानं तब्बल 16 वर्षांनंतर म्हणजेच, 2006 नंतर पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :