Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chaha) आगामी टी 20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगनं (Brad Hogg) व्यक्त केला आहे. तसंच ऑस्ट्रेलिया, भारत किंवा पाकिस्तान या तीनपैकी कोणताही एक संघ टी 20 विश्वचषक जिंकेल असं भाकितही हॉगनं केलं.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या निमित्तानं वेस्टर्न ऑस्ट्रेलिया टूरिझमतर्फे मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना ब्रॅड हॉगनं युजवेंद्र चहलसह इतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य केलं. गेल्या विश्वचषकात डावलण्यात आलेल्या चहलनं स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आगामी विश्वचषकात तो भारतीय संघाचा हुकमी एक्का ठरु शकतो असं हॉगनं म्हटलंय.
विश्वचषकासाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया टूरिझम सज्ज
यंदा वर्षाच्या उत्तरार्धात खेळवण्यात येणा-या आयसीसी टी२० विश्वचषकाच्या निमित्तानं क्रीडाप्रेमींनी ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या राज्याला भेट द्यावी यासाठी टूरिझम डब्ल्यूएनं खास मिशन आखलंय त्यासाठी मुंबईसह दिल्लीतही खास कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटिंग लिजण्ड ब्रॅड हॉगसह वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री रॉजर कूक आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅरोलिन टर्नबुल हे या मिशनचा प्रसार करणार आहेत. वेस्टर्न ऑस्ट्रेलियात जास्तीत जास्त भारतीय पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी भारतातून थेट ऑस्ट्रेलियापर्यंत विमानसुविधा देण्यात येणार आहे. तसच किचकट असणारी ऑस्ट्रेलियन व्हिसाची प्रक्रिया लवकरच सोपी केली जाईल असाही विश्वास रॉजर कूक यांनी व्यक्त केला.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात आयसीसी टी२० विश्वचषकाचे काही सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे सामन्यासह पर्थच्या आसपास असणारे समुद्रकिनारे, निसर्ग व वन्यजीवन, स्थानिक खाद्यसंस्कृती अशा गोष्टींचा अनुभवही पर्यटकांना घेता येणार आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातल्या पर्थच्या वाका स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात स्पर्धेतला साखळी सामना खेळवला जाणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी हा सामना पार पडेल.
हे देखील वाचा-
- ENG vs IND, 2nd ODI : भारतीय फलंदाजी ढासळली, 100 धावांनी इंग्लंड विजयी, मालिका 1-1 ने बरोबरीत
- IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराह संघात नाही, कसा आहे संपूर्ण स्कॉड?
- India Tour of West Indies 2022: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?