Netherlands vs South Africa : टी-20 विश्वचषक स्पर्धेत ( ICC T20 World Cup 2022 ) मोठा उलटफेर झाला आहे. नेदरलँड्सच्या ( Netherlands ) संघाने दक्षिण आफ्रिकेवर ( South Africa ) दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला. नेदरलँडच्या विजयानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ( T20 World Cup 2022 ) समीकरणं बदलली आहेत. इतकंच नाही तर नेदरलँडच्या टीमने पुढील विश्चचषकात आपला प्रवेश निश्चित केला आहे.
नेदरलँडचा आफ्रिकेवर 13 धावांनी दणदणीत विजय
टी20 विश्वचषक 2022 मधील 40 वा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेदरलँडने 20 षटकांत 4 बाद 158 धावा केल्या, मात्र आफ्रिकन संघाला ही धावसंख्या पार करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत आठ विकेट्सवर केवळ 145 धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिका टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
नेदरलँडकडून पराभव झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सविरुद्धचा सुपर-12 मधील शेवटच्या सामन्यात 13 धावांनी पराभव झालाय. त्यामुळे आफ्रिकन संघाचे पाच सामन्यांत केवळ पाच गुण झाले. आफ्रिकन संघाचा निव्वळ रनरेट +0.864 वर घसरला. आफ्रिकेचा संघ बाद होताच भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशला अपेक्षा
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा फायदा पाकिस्तान आणि बांगलादेशला होईल. या दोघांमधील पुढील सामन्यातील विजेत्याला उपांत्य फेरीत स्थान मिळेल. पाकिस्तानचा निव्वळ रन रेट सध्या +1.117 आहे. चार सामन्यांत त्याचे चार गुण आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना रद्द झाला तरी तो पाच गुणांसह चांगल्या नेट रनरेटच्या आधारे पुढे जाईल.
आज भारत आणि झिम्बाब्वे सामना
भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात रविवारी टी-20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना मेलबर्न क्रिकेटच्या ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध विजयाची नोंद करून अंतिम चारमध्ये पोहोचायचं लक्ष्य होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.