T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात काल मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळला गेलेला टी-20 सामना कदाचित दोन्ही देशांतील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना असेल. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. भारताच्या विजयात विराट कोहलीनं (Virat Kohli) महत्वाची भूमिका बजावली. या विजयासह भारतानं गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकातील बदलाही घेतला. दरम्यान, पाकिस्तानला पराभवाची धुळ चारल्यानंतर भारतीय संघ सिडनीत दाखल झालाय. जिथे भारत आणि नेदरलँड गुरुवारी एकमेकांशी भिडतील. त्यानंतर भारताचा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशसोबत होईल.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघ सिडनीत दाखल
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेतील त्यांचा दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळेल. हा सामना गुरुवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाईल. लेगस्पिनर युजवेंद्र चहलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर पत्नी धनश्री शर्मासोबतची एक स्टोरी शेअर केलीय. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं सिडनीला पोहोचल्यानंतरचा फोटो शेअर केलाय.
नेदरविरुद्ध विजयासाठी भारतीय संघ सज्ज
नेदरलँडचा संघानं पात्रता फेरीत यूएई आणि नामिबियाचा पराभव करून सुपर -12 मध्ये स्थान मिळवलंय. दरम्यान, नेदरलँड्सला सुपर-12 फेरीतील त्यांच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशकडून 9 धावांनी पराभव स्वीकाराला लागलाय. दुसरीकडं पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. अशा स्थितीत दुबळ्या नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून भारतीय संघ रन रेटमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल.
भारताचे पुढील सामने
नेदरलँड्सनंतर भारतीय संघ स्पर्धेतील आपला तिसरा सामना 30 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यानंतर 2 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. तर, भारतीय संघ सुपर -12 फेरीतील अखेरचा सामना 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल.
टी-20 विश्वचषकातील भारताचं वेळापत्रक:
सामना | विरुद्ध संघ | तारीख | वेळ | ठिकाण | निकाल |
पहिला सामना | पाकिस्तान | 23 ऑक्टोबर | दुपारी 1.30 वा. | मेलबर्न | विजय |
दुसरा सामना | नेदरलँड्स | 27 ऑक्टोबर | दुपारी 12.30 वा. | सिडनी | - |
तिसरा सामना | दक्षिण आफ्रिका | 30 ऑक्टोबर | दुपारी 4.30 वा. | पर्थ | - |
चौथा सामना | बांग्लादेश | 2 नोव्हेंबर | दुपारी 1.30 वा. | अॅडिलेड | - |
पाचवा सामना | झिम्बाब्वे | 6 नोव्हेंबर | दुपारी 1.30 वा. | मेलबर्न | - |
हे देखील वाचा-