PM Modi & Amit Shan with Team India Viral Video : विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा (India) पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. यामुळे यजमान टीम इंडियाचं (Team India) तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं. सलग 10 सामने जिंकलेल्या भारताला अंतिम सामन्यात मात्र, पराभव स्वीकारावा लागला. हे सत्य पचवणं टीम इंडियासह प्रत्येक भारतीयाला अवघड जात आहे. सामन्यानंतर टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूच्या डोळ्याचा कडा पाणावल्या. हे दृश्य चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ड्रेसिंग रुममध्ये (Dressing Room) जाऊन टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक करत त्याचं मनोधैर्य वाढवलं. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.


टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले पंतप्रधान


गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाची भेट घेतली. सामन्यानंतर पंतप्रधान मोदी थेट टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले आणि त्यांनी खेळाडूंचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधला आणि संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहन दिलं.


पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं


टीम इंडियाच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहलीसह अनेक खेळाडूंशी चर्चा केली. यावेळी निराश टीम इंडियाच्या खेळाडूंना पाहून पंतप्रधान मोदींनी धीर दिला. पंतप्रधान मोदींसोबत गृहमंत्री अमित शाहा यांनीही खेळाडूंची भेट घेतली.


नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


टीम इंडियाच्या भेटीत पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही सर्व 10 सामने जिंकला आहात, असं होतंच असतं. चेहऱ्यावर आनंद दाखला, संपूर्ण देश तुम्हाला पाहत आहे. मी तुम्हा सर्वांना एकदा भेटण्याचा विचार केला, असं मोदी यांनी विराट आणि रोहितला म्हटलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविडसोबत मराठीत संवाद साधला. काय राहुल कसंय, असं विचारत मोदींनी राहुलची विचारणा केली. तुम्ही खूप मेहनत केली आहे, असं म्हणत त्यांनी कोच राहुलचं कौतुक केलं. जडेजासोबतही हात मिळवणी करत त्याच्यासोबत राजस्थानीमध्ये बातचीत केली.


खेळाडूंसोबतचा पंतप्रधान मोदींचा व्हायरल व्हिडीओ पाहा






पंतप्रधानांकडून सर्व खेळाडूंचं कौतुक 


यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोहम्मद शामीचं कौतुक करत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. तर जसप्रीत बुमराहसोबत पंतप्रधानांनी गुजराती भाषेत संवाद साधला. श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, कुलदीप यादव, केएल राहुल यांसह सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक केलं. तुम्ही सर्वांनी खूप मेहनत केली आहे, हे संपूर्ण भारताला माहित आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं मनोबल वाढवलं.