PAK vs SL, World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) मध्ये पाकिस्तान (Pakistan) संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. नेदरलँडचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तान संघाचे दोन्ही सामने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आले. हैदराबादच्या मैदानावरील सामन्यानंतर बाबर आझमसह पाकिस्तानी क्रिकेट संघाने भारतीय चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर ग्राउंड स्टाफला खास भेट देऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी पाकिस्तान संघाचं ग्राउंड स्टाफसोबतच वर्तन चर्चेत आहे.


पाकिस्तानी संघाने जिंकली भारतीय चाहत्यांची मने


हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानने पहिले दोन सामनेही खेळले. विश्वचषकात 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करत विजयी सलामी दिली. त्यानंतर, 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय मिळवला. विश्वचषकात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रमही पाकिस्तानने या सामन्यात आपल्या नावावर केला.






ग्राउंड स्टाफचे मानले आभार


वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग दुसऱ्या विजयानंतर बाबर आझमने हैदराबादच्या ग्राउंड स्टाफचे आभार मानले आणि त्यांना मॅच जर्सी भेट दिली. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर पाकिस्तान संघातील खेळाडूंनी हैदराबादच्या ग्राउंड स्टाफसोबत फोटो क्लिक केले. यामुळे पाकिस्तानी संघाने भारतीय चाहत्यांची मने जिंकली असून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.






विश्वचषकात पाकिस्तानचा खास विक्रम


श्रीलंकेसमोरील सामन्यात पाकिस्तान संघासमोर 345 धावांचे लक्ष्य होते. पाकिस्तानने हे आव्हान 48.2 षटकांत 4 विकेट गमावून पूर्ण केलं. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. पाकिस्तानने हा विक्रम रचला आहे. याआधी हा विक्रम आयर्लंड संघाच्या नावावर होता, आयर्लंडने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध 328 धावांचे लक्ष्य पूर्ण केलं होतं.






विश्वचषकात एका संघाविरुद्ध सर्वाधिक सलग विजय


आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही एका संघाविरुद्ध काही संघांनी दमदार विक्रम रचले आहेत. विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवून पाकिस्तान आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. विश्वचषकात आतापर्यंत पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध आठ सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत.