PAK vs ZIM T20 world cup 2022 : टी 20 विश्वचषकातील थरारक सामन्यात झिम्बावेच्या संघानं पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव केलं. 131 धावांचं मोजकं आव्हानही पाकिस्तानला पेलवलं नाही. दिग्गज फलंदाजींनी हराकिरी केल्याचा फटका पाकिस्तानच्या संघाला बसला आहे. पाकिस्तानच्या संघाचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. नेटकऱ्यांनी पाकिस्तानवर टीकेची झोड उडवली आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या पराभवानंतर नाराजी व्यक्त केली आहे. शोएब अख्तर आणि मोहम्मद आमिर यांनाही पाकिस्तानच्या निवड समितीवर टीकास्त्र सोडलं आहे. टी 20 विश्वचषकात सलग दुसरा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी संघ निवड आणि संघाच्या नियोजनावर निशाना साधला आहे.
खराब टीम सेलेक्शनवर पहिल्यापासूनच बोलतोय - मोहम्मद आमिर
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यानेही पराभवानंतर आपला राग व्यक्त केला आहे. मोहम्मद आमिरने ट्वीट करत पाकिस्तानच्या टीम सिलेक्शनवर निशाना साधलाय. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, मी पहिल्या दिवसांपासूनच खराब टीम सेलेक्शनवर बोलत आहे. आता या पराभवाची जबाबदारी कोण घेणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आणि मुख्य निवडकर्ता यांना टाटा बाय बाय म्हणायची वेळ आली आहे. पाकिस्तान बोर्डाचे चेअरमन स्वत:ला देव मानत आहे, त्यांच्यावर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
शोएब अख्तरनेही साधला निशाना -
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही एक व्हिडीओ ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर अख्तर म्हणाला की, ही हार निराशाजनक आहे. सरासरी खेळ आणि सरासरी निकाल लागला आहे. पाकिस्तान संघ आपल्या पूर्ण क्षमतेनं खेळला नाही. अन्य एका ट्वीटमध्ये अख्तर म्हणाला की, झिम्बावे आहे तर सगळं सुरळीत होईल का? त्यासाठी खेळावं लागेल. असेही म्हटलेय.
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम आक्रम यानेही हा पराभव आश्चर्यकारक असल्याचं म्हटलेय.
सामन्याचा लेखाजोखा -
नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. झिम्बाब्वेकडून सेन विल्यम्सनं सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनिअर उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं या सामन्यातील चार षटकात 24 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर शादाब खाननं तीन विकेट्स घेतल्या. तर,हारिफ रौफच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली. 131 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले. बाबर आझम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळं पाकिस्तानची टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता वाढलीय.