India va Pakistan,World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दुपारी 2 वाजता महामुकाबला रंगणार आहे. जगभरातील सर्व चाहत्यांच्या नजरा आजच्या सामन्याकडे लागल्या आहेत. पाकिस्तानी क्रिकेट संघ तब्बल सात वर्षांनातर भारतात आला आहे. भारतीय भूमीवर पाकिस्तान विरुद्धचा सामना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 


भारत आणि पाकिस्तान महामुकाबला


एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानी संघाविरुद्ध सात सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. आज टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धचा विक्रम काय राखण्यासाठी सज्ज आहे. अहमदाबादच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या. या पाच खेळाडूंपैकी तीन खेळाडू निवृत्त झाले असून दोन खेळाडू आज होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात मैदानात उतरणार आहेत.


'या' 5 भारतीय खेळाडूंकडून अहमदाबादमध्ये सर्वाधिक धावा


1. राहुल द्रविड


राहुल द्रविडने अहमदाबादच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने 5 सामन्यात 342 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतके झळकावली आहेत. अहमदाबादच्या मैदानावर राहुल द्रविड सर्वोत्तम धावसंख्या 109 आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.


2. रोहित शर्मा


अहमदाबादच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 5 सामन्यात 221 धावा केल्या आहेत, यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या मैदानावर त्याचा स्ट्राईक रेट 94.04 राहिला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आजच्या सामन्यात भारतीय चाहत्यांना कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.


3. सचिन तेंडुलकर


अहमदाबादच्या मैदानावर सचिन तेंडुलकरने 5 सामन्यात 215 धावा केल्या आहेत. सचिनने एक शतक झळकावलं आहे. अहमदाबादच्या मैदानावर सचिन तेंडुलकरची सर्वोत्तम धावसंख्या 123 आहे. सचिनने 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.


4. सौरव गांगुली


सौरव गांगुलीने अहमदाबादच्या मैदानावर तीन सामने खेळले आहेत. त्याने 190 धावा केल्या असनू यामध्ये एकदा शतकी खेळी केली होती. अहमदाबादमध्ये सौरव गांगुलीचा स्ट्राइक रेट 94.52 आहे. गांगुलीने 2008 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.


5. विराट कोहली


विराट कोहलीने अहमदाबादच्या मैदानावर सात सामने खेळले असून त्याने 176 धावा केल्या आहेत. कोहलीला अद्याप या मैदानावर शतक झळकावता आलेलं नाही. मात्र वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याची बॅटने नेहमीच तुफान खेळी केली आहे. 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावलं होतं. आजच्या सामन्या कोहली कोणता नवीन विक्रम रचणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


IND vs PAK, World Cup 2023 Exclusive : टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी मास्टर ब्लास्टर अहमदाबादेत, कोण जिंकणार सचिननं थेटच सांगितलं