Jasprit Bumrah Fitness : भारतीय क्रिकेट संघाची गोलंदाजी पूर्वीपासून फिरकीपटूंवरच अवलंबून आहे. फलंदाजीच्या बाबतीत दमदार असणारा भारत गोलंदाजीमध्ये फिरकी गोलंदाजीवर अवलंबून असला तरी मागील काही वर्षात भारतीय संघात भेदक गोलंदाजी करणारे फास्टर दिसून येत आहेत. यातीलच एक आघाडीचा गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah). पण मागील काही काळ दुखापतींमुळे बुमराह खास कामगिरी करु शकला नसून आता आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतूनही बाहेर गेल्याची माहिती समोर येत आहे. बुमराह जवळपास सहा महिने दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचं म्हटलं जात आहे, दरम्यान बुमराहच्या या दुखापतीला बीसीसीआय जबाबदार असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. बीसीसीआयनं केलेल्या घाईमुळे बुमराह दुखापतीतून सावरु शकला नाही, ज्यामुळे त्याची दुखापत आणखी वाढल्याचं काही क्रिकेटचाहते म्हणत आहेत.


गुरुवारी (29 सप्टेंबर) समोर आलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात तो खेळणार नसल्याचं पीटीआयनं बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं. बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशिया कप सामन्यांनाही मुकला. त्यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून बुमराहला संघात पुन्हा बोलवण्यात आलं त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन सामने तो खेळला पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. दरम्यान बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी योग्य वेळ दिला न गेल्याने तो आता पुढील काही महिने सामने खेळू शकणार नाही असं दिसून येत असल्याने भारतीय क्रिकेट फॅन्स बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित करत आहेत. 


बुमराहचीऐवजी कोणाला संधी?


टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये दीपक चाहर आणि मोहम्मद शामी दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे, संघातील महत्वाचा खेळाडूला दुखापत झाल्यास राखीव खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवलं जातं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत दीपक चाहरनं चांगली गोलंदाजी केलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं चार षटकात 24 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. परंतु, जसप्रीत बुमराहऐवजी कोणला भारतीय संघात संधी मिळेल? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दीपक चाहर, मोहम्मद शामी किंवा अन्य कोण? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.


हे देखील वाचा-