AUS vs IRE, T20 World Cup 2022 : अखेरपर्यंत लढणं काय असतं, हे नुकत्याच पार पडलेल्या आयर्लं विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ireland vs Australia) सामन्यात आयर्लंडचा फलंदाज लॉर्कन टकर (Lorcan Tucker) याने दाखवून दिलं. लॉर्कनने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला जिंकवून देण्याचा संपूर्ण प्रयत्न केल्या, पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर आयर्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून 42 धावांनी पराभव झाला. टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड संघ आमने-सामने होते. यावेळी आधी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने 180 धावाचं लक्ष्य आयर्लंडला दिलं होतं, ते पार करताना आयर्लंडचा संघ 137 धावाच करु शकला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 42 धावांनी विजयी झाला.
आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा होता. कारण आयर्लंडची (Ireland Team) स्थितीही ऑस्ट्रेलियाप्रमाणेच होती. दोघांनी एक सामना जिंकला असून एक गमावत एक सामना अनिर्णीत राहिला होता. पण नेट रनरेटच्या जोरावर ते ऑस्ट्रेलियाच्या पुढे होता. पण आता ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत 5 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तसंच कांगांरुनी सेमीफायनलच्या (T20 World Cup Semifinal Scenario) दिशेने यशस्वी पाऊल देखील टाकलं आहे. सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत आयर्लंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. आयर्लंड संघाने गोलंदाजीही चांगली केली. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचने 63 धावांची झुंज देत संघाला एक दमदार धावसंख्या करुन दिली. स्टॉयनीसनेही 35 धावा केल्या. ज्यामुळे 20 षटकांत ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावत 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
180 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या आयर्लंडला सुरुवातीपासून झटके बसत होते. एकाही फलंदाजाला टिकून खेळता येत नव्हता. पण यष्टीरक्षक फलंदाज लॉर्कन टकर याने सुरुवातीपासून अखेपर्यंत टिकून राहून नाबाद 71 धावा केल्या, पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर आयर्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून 42 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स, झाम्पा, स्टार्क आणि मॅक्सवेलने प्रत्येकी 2 तर स्टॉयनिसने 1 विकेट घेतली.ऑस्ट्रेलियन कर्णधार आरॉन फिंचला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.